सांगली महापूर : पुराचा विळखा सैल होणार?

सांगली : शहरातील टिळक चौक परिसरात पाणी आल्याने तेथील रहिवाशांना सामाजिक कार्यकर्ते व मनपाच्या पथकाने बोटीतून बाहेर काढले.
सांगली : शहरातील टिळक चौक परिसरात पाणी आल्याने तेथील रहिवाशांना सामाजिक कार्यकर्ते व मनपाच्या पथकाने बोटीतून बाहेर काढले.
Published on
Updated on

सांगली मधील महापूर ओसरण्याची चिन्हे आहेत. पुराचा विळाखा थोडसा सैल होण्याची शक्यता आहे. परिसर व जिल्ह्यात पावसाने शनिवारी काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे कोयना, धोम, कण्हेर, चांदोली धरणांतील पाण्याच्या विसर्ग कमी करण्यात आला आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेकपेक्षा जादा पाणी सोडले जात आहे. परिणामी सांगलीसह शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव तालुक्यांतील नदीकाठच्या महापुराची मगरमिठी रविवारी सैल होईल, अशी आशा वाटू लागली आहे.

अद्यापही हजारो लोक पशुधनांसह बाहेरच आहेत. 74 पेक्षा अधिक रस्ते पाण्याखाली आहेत.लाखो लिटरचे दूध संकलन ठप्प आहे. पूरग्रस्तांना मदतकार्य वेगात सुरू आहे.

बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले. शुक्रवारी पाणी दोन्ही नद्यांच्या पात्राबाहेर पडले. यामुळे शनिवारी सांगली शहरासह जिल्ह्यातील नदीकाठाला महापुराचा विळखा पडला.

शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील अनेक गावे बुडाली. अनेक गावे, वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. पिकांसह शेकडो रस्ते पाण्याखाली आहेत. पुराच्या वेढ्यात अडकण्याच्या भीतीने शुक्रवारी हजारो लोकांनी पशुधनांसह स्थलांतर केले आहे.

अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक, महसूल, पोलिस प्रयत्न करीत आहेत. मागील पुराचा अनुभव भीतीदायक असल्याने यावेळी लोकांनी स्वत:च स्थलांतर केल्याने बचावकार्य फारसे करावे लागले नाही. सांगलीतील दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, बायपास परिसर, दत्त-मारुती रोड, तरुण भारत स्टेडियम, राजवाडा चौक, शिवाजी मंडई, कोल्हापूर रोड, पत्रकारनगर, गणपती पेठ, कर्नाळ नाका, शामरावनगर, हरिपूर रस्ता, शंभरफुटी रोड, खिलारे मंगल कार्यालय या परिसरात पाणी घुसले आहे.

दरम्यान, धरण परिसरातील दोन दिवस सुरू असणारा जोरदार पाऊस आज काहीसा ओसरला होता. जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता सरासरी 53.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मिरज तालुक्यात 57.5, जत तालुक्यात 1.8, खानापूर-विटा तालुक्यात 32.9, वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 140.9, तासगाव तालुक्यात 27, आटपाडी तालुक्यात 4.8, कवठेमहांकाळ तालुक्यात 14.2, पलूस तालुक्यात 59.1, कडेगाव तालुक्यात 52.8 मि.मी. पाऊस पडला.

तसेच कोयना धरण भागात गेल्या 24 तासांत (शुक्र्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत) 204 मि.मी. पाऊस पडला. नवजाला 207 व महाबळेश्‍वरला 287 असा पाऊस पडला आहे. धोमला 173, कण्हेरला 153 व कराड भागात 124 मि.मी. पाऊस पडला. शनिवारी दिवसभरात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना 33, नवजा 18, महाबळेश्‍वरला 52 मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांत पाण्याची आवक कमी झाली आहे.

कोयना धरणात शुक्रवारी दोन लाखाने येणारे पाणी आज प्रतितास 70 हजार क्युसेक येत होते. कोयनात सध्या 83 टीएमसी पाणी झाले आहे. पाऊस ओसरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. काल 54 हजार असणारा विसर्ग आज दिवसभरात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता कोयनेतून 30 हजार क्युसेक पाणी प्रतिसेकंदाला सोडले जात होते. धोम, कण्हेरमधूनही दहा हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.

यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. कराडमधील कोयना पूल येथे रात्री एक वाजता 58 फूट असणारे पाणी सायंकाळी पाच वाजता 49 फुटापर्यंत कमी झाले. कराडमधील कोयना पूल येथे 15 तासांत पाणी 51 फुटांवरून 43 पर्यंत कमी झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे पुलाजवळ पहाटे दोन वाजता 33.6 फूट असणारे पाणी रात्री आठ वाजता 32 फूट झाले आहे. ताकारी पूल येथे सकाळी 11 वाजता 65.2 फूट असणारे पाणी रात्री आठ वाजता 64 फूट झाले. भिलवडी पूल येथे सायंकाळी सात वाजता 60 फूट असणारे पाणी रात्री नऊ वाजता 59.5 झाले. दहा वाजता पाणी काहीसे ओसरू लागले. सांगलीत मात्र पाणी वाढत होते. सायंकाळी सात वाजता 52.5 फूट होती. हे पाणी रात्री 1 वाजल्यानंतर कमी होऊ लागले.

याबरोबरच वारणा नदीवरील चांदोली धरण परिसरातीलही पावसाचा कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत (शुक्र्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत) 285 मि.मी. पाऊस झाला. धरणात 70 हजार क्युसेकने येणारे पाणी 40 हजारांपर्यंत कमी झाले. यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग काल 30 हजार क्युसेकने सोडले जात असणारे पाणी दुपारी 19 हजार, सायंकाळी 16 हजारपर्यंत कमी केले. यामुळे वारणेच्या पाण्याची गती कमी झालीआहे. पाणी रात्री उशिरा कमी होऊ लागले.

यामुळे वारणा काठाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे.दोन्ही नद्यांचे पाणी रविवारी सायंकाळपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. सोमवारी पाणी पूर्णपणे पात्रात जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अलमट्टीने पाणी सोडल्याने सांगली वाचली

अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. या धरणात सध्या अडीच लाख क्युसेक पाणी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून जात आहे. त्यामुळे या धरणातून साडेतीन लाख क्युसेक विसर्ग प्रतिसेकंद सुरू केला आहे. परिणामी शुक्रवारी 90 टीएमसी असणार्‍या धरणात आज सायंकाळी 76 टीएमसीपर्यंत पाणीसाठा कमी झाला. यामुळे महापुराची पातळी कमी होऊ लागली आहे.

जिल्ह्यात 74 रस्त्यावरील वाहतूक बंद

जिल्ह्यात पावसामुळे, पुरामुळे व इतर कारणामुळे आत्तापर्यंत शिराळा, मिरज, वाळवा, पलूस व कडेगाव तालुक्यांमधील एकूण 74 रस्त्यांवरील वाहतूक खंडित, बंद पडली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

विविध धरणे व पुलाजवळील पाण्याचा विसर्ग

कोयना धरण : 30 हजार, चांदोली धरण : 28250 हजार, धोम : दहा हजार, कण्हेर : दहा हजार. आयर्विन पूल-सांगली : 1 लाख 81 हजार, राजापूर बंधारा : 1 लाख 88हजार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news