

सांगली ; विवेक दाभोळे : वाढती मागणी, तुलनेने जेमतेम पुरवठा यामुळे रासायनिक खतांचा 'काळाबाजार', लिंकिंग असतानाच यात बनावट खतांची खुलेआम विक्री होत आहे. खतांचा काळाबाजार करणार्या व्यापार्यांवर कृषी विभागाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, याचबरोेबर बाजारातील बनावट खते रोखण्याचे खरे आव्हान कृषी विभागापुढे आहे.
रासायनिक खत निर्मितीसाठी फॉस्फेट मोठ्या प्रमाणात लागते. मात्र जागतिक पातळीवरील विविध कारणांनी कमी झालेले फॉस्फेट आणि यातून होत असलेले खतांचे 'बॉटम्लाईन' उत्पादन याचा सलग दुसर्या खरिपात शेतकर्यांना फटका बसू लागला आहे.
गेल्या हंगामात खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. याहीवेळी खते महाग झाली. याचवेळी लिंकिंग आहेच. यातून सामान्य शेतकर्याला खते मिळतात. मात्र, त्याला खतांचा दजार्र् आणि दर याबाबत काहीच बोलता येत नाही. या खरीप हंगामासाठी तरी कृषि विभागाने खतांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन केले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हे नियोजन प्रत्यक्षात उतरण्याची गरज आहे.
जिल्ह्यात खरिपासाठी तीन लाख 93 हजार 459 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. पावसाचे आगमन लांबले आहे. यामुळे पेरणीस गती नाही. मात्र, शेतकरी खतांची खरेदी करून ठेवत आहे. पण त्याला वाढते दर, बनावट खते यांचा सामना करावा लागत आहे. खतांचा काळाबाजार रोखणे, खतांचा पुरेसा पुरवठा यासाठी कृषी विभाग 'अॅक्शन' मोडवर राहणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही, म्हणूनच काळाबाजार करणार्यांचेच फावले आहे. साधारणपणे खरिपासाठी जवळपास दीड लाख ते 1 लाख 65 हजार टन खतांची गरज भासते.
दरम्यान, जाणकारांतून सांगण्यात येते की, शेतकर्यांनी ठराविक कंपनीच्या, ठराविक खतांच्या मागे न लागता उपलब्ध सरळ खतांचा (नत्र, स्फुरद, पालाशयुक्त) उपयोग करावा. युरिया, डीएपी तसेच म्युरेट ऑफ पोटॅश यांचे मिश्र खत वापरणे फायद्याचे ठरू शकते. मात्र ठराविक खतांसाठी शेतकर्यांचा आग्रह हेच खतांच्या काळाबाजाराचे मुख्य कारण ठरत आहे. तर वाढती मागणी खतांच्या टंंचाईचे मूळ कारण ठरत आहे. जिल्ह्यासाठी सरासरी चार हजार टन सुफला तर 22000 टन 10:26:26 खताची मागणी असते. उपलब्ध खतांचा वापर करून शेतकरी मिश्र खत तयार करू शकतात. त्यामुळे शेतकर्यांनी ठराविक कंपनीच्या, ठराविक खताच्या मागे न लागता बाजारात उपलब्ध सरळ खतांचा (नत्र, स्फुरद, पालाशयुक्त) उपयोग करण्याची गरज आहे.
युरिया, डीएपी तसेच म्युरेट ऑफ पोटॅश यांचे मिश्र खत करून ते वापरणे फायद्याचे ठरू शकते, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातून खतांच्या काळ्या बाजाराला आणि लिंकिंगला देखील काही प्रमाणात आळा बसू शकेल. कृषी विभागाने मणेराजुरीत बनावट खतांचा प्रकार उघडकीस आणला. जूनच्या सुरुवातीला इस्लामपूरमध्ये सोयाबीनचे बोगस बियाणे पॅक करून विकणार्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. कृषी विभागाने भरारी पथकांच्या माध्यमातून असे उद्योग रोखण्यासाठी दक्ष राहण्याची गरज व्यक्त होत आहे.