

कोल्हापूर/जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : सांगली-कोल्हापूर मार्ग आता महामार्ग नसून तो मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या सहा महिन्यांत सांगली-कोल्हापूर महामार्गावर 34 हून अधिक जणांचे बळी गेल्याची माहिती समोर आली आहे; तर महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असतानाही बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर महामार्गातील त्रुटी दूर करणार, असा सवाल वाहनधारकांतून होत आहे.
सांगली – कोल्हापूर महामार्गावरील उदगाव, जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, माले फाटा, हेरले ही अपघातप्रवण क्षेत्रे बनली आहेत. सध्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात या मार्गाचे विलीनीकरण करण्याच्या कारणातून बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावर दुभाजक, जोड रस्त्याला पांढरे पट्टे, गतिरोधक, दिशादर्शक फलक, ओढ्यावरील पुलाला संरक्षण कठडे नाहीत, तमदलगे येथे धोकादायक बाह्यवळण, हातकणंगले येथे अर्धवट स्थितीतील उड्डाणपूल अशा मोठ्या समस्या असताना, शिवाय अपघाताचीही मालिका मोठी असताना सर्व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सध्या सांगली सिव्हिल रुग्णालयात सहा महिन्यांत महामार्गाचे 24 बळी गेल्याची नोंद आहे. शिवाय इतर शासकीय व खासगी रुग्णालयांत 10 हून अशा 34 हून अधिक जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शनिवारी जैनापूर येथे महामार्गावर झालेल्या अपघातानंतर सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अपघातातील मृत्यू झालेल्यांची माहिती घेतली आहे. यात नऊ महिन्यांत तब्बल 24 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शिवाय खासगी व इतर रुग्णालयांतील मृतांची नोंद मिळाली नाही. -डॉ. शिलवर्धन चिपरीकर, वैद्यकीय अधिकारी