

येथील राजवाड्यातील सांगली कारागृह मध्ये शनिवारी रात्री महापुराचे पाणी घुसले. त्यामुळे कारागृह प्रशासन आणि कैद्यांची तारांबळ उडाली. त्या ठिकाणच्या काही कैद्यांना जवळील एका शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
येथील कारागृहात सध्या तीनशेवर कैदी आहेत. कोरोना संसर्गामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. पाणी पातळी 50 फुटांच्यावर जाणार नाही. त्यामुळे पाणी आपल्याकडे येणार नाही, असा कारागृह प्रशासनाचा अंदाज होता. मात्र शनिवारी रात्री पाणी येण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी पाणी आणखी वाढले. त्यामुळे कैद्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यांना एकत्र केल्यामुळे गर्दी होऊ लागली. त्यामुळे महिला कैदी आणि इतर काही कैद्यांना तातडीने कारागृहाजवळील एका शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
2019 मध्ये आलेल्या महापुराच्या वेळीही कैद्यांना स्थलांतरित करावे लागले होते. कैदी स्थलांतरित करीत असताना दोनजण पळाले होते. त्यानंतर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते.
सांगली संस्थान काळापासून हे कारागृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहराच्या बाहेर नवीन जागेत स्थलांतरित करावे, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र त्यासाठी जागा मिळालेली नाही.
सांगली शहर, ग्रामीण पोलिस ठाणे पाण्यात
सांगली शहर, ग्रामीण आणि पोलिस उपअधीक्षक कार्यालयात महापुराचे पाणी घुसले आहे. यापूर्वी 2019 मध्ये आलेल्या महापुराच्यावेळीही पाणी आले होते. त्यावेळी मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पोलिस ठाण्याची रंगरंगोटी आणि डागडुजी नुकतीच करण्यात आली होती. आता पुन्हा या पुराचे पाणीही गेले आहे.