सांगली : ई.डी.कडून आक्षेपार्ह कागदपत्रे, माहिती ताब्यात
सांगली; पुढारी वृत्तसेवा : एका कर सल्लागाराच्या सांगली व मिरजेतील कार्यालयातून ई.डी.च्या अधिकार्यांनी आक्षेपार्ह कागदपत्रे तसेच संगणकातील काही डाटा ताब्यात घेतला असल्याची चर्चा जोरात आहे.
राज्य मंत्रिमंडळातील एका वादग्रस्त मंत्र्यांच्या निकटवर्तीय अधिकार्याशी संबंधित कर सल्लागाराच्या (चार्टर्ड अकौंटंट)कार्यालयात शुक्रवारी ई.डी.ची धाड पडली. शुक्रवारी सकाळपासून चौकशी, तपासणी सुरू झाली. त्याची चर्चा दिवसभर जोरात सुरू होती.
संबंधित कर सल्लागार मिरजेचा आहे. त्यांचे मिरज व सांगली येथे कार्यालय आहे. या दोन्ही कार्यालयातील कागदपत्रांची तसेच संगणकातील माहितीची छाननी ई.डी.च्या अधिकार्यांनी केली आहे. काही आक्षेपार्ह कागदपत्रे, संगणकातील डाटा ताब्यात घेऊन ई.डी.चे अधिकारी शनिवारी सांगलीतून गेले असल्याची चर्चा आहे. मात्र कोणतीही अधिकृत माहिती अथवा कोणताही तपशील अधिकृतपणे हाती लागू शकला नाही. ई.डी.ने ही चौकशी अतिशय गोपनीय ठेवली असल्याची चर्चा आहे.
राज्य मंत्रिमंडळातील एका वादग्रस्त मंत्र्याचा निकटवर्तीय अधिकारी सांगली जिल्ह्यातील आहे. या अधिकार्याची सांगली जिल्ह्यात बरीच मालमत्ता आहे. मध्यंतरी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने सांगलीत दोन-तीन ठिकाणी भेट देऊन चौकशीची मागणी केली होती. संपत्तीच्या अनुषंगाने बरेच आरोपही केले होते. दरम्यान या अधिकार्याच्या आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने संबंधित कर सल्लागाराची चौकशी झाली असणार, अशी चर्चा सुरू होती.

