

2023 हे नवे वर्ष सर्वच राजकीय पक्षांसाठी कसोटीचे ठरणार आहे. कारण, या वर्षात जवळपास सात महापालिकांच्या, चार जिल्हा परिषदांच्या 41 पंचायत समित्या आणि 17 नगरपालिका आणि 1 शिक्षक मतदारसंघ अशा निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत होत आहेत. त्यामुळे नवीन स्थापन झालेले बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष अशा सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
कोकण प्रदेश हा मुंबईसह पाच जिल्ह्यांचा आहे. या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्य लढत आहे ती भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात. उद्धव ठाकरेंबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे, तर भाजपबरोबर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार होते, त्यातील सावंतवाडीचे दीपक केसरकर हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आहेत, तर दुसरे वैभव नाईक हे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षात आहेत. याशिवाय खासदार विनायक राऊत हेसुद्धा उद्धव ठाकरेंबरोबरच आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपही मजबूतपणे उभी आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदही भाजपकडे आहे, तर जिल्हा परिषदेत दोन नंबरचा पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. या जिल्ह्यामध्ये येणार्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातही सिंधुदुर्गची भूमिका निर्णायक राहणार आहे. या निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे काम पाहणार आहेत, तर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मोठी रंगत पाहायला मिळेल. मावळती जिल्हा परिषद ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडे होती. या जिल्ह्यात शिवसेनेकडे चार आमदार होते. त्यापैकी दोन उद्धव ठाकरे यांच्याकडे, तर दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर येणार्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका अधिक रंगतदार होणार आहेत.
मावळत्या जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव अध्यक्षपदी होते. त्यामुळे येणार्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची सूत्रे उद्धव ठाकरे गटाकडून भास्कर जाधवांकडे दिली जाऊ शकतात, तर शिंदे गटाकडून ही सूत्रे बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते रामदास कदम यांच्याकडे राहणार आहेत. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असल्याने आणि त्यांचे राजकीय होमपीच हे रत्नागिरी असल्याने त्यांची भूमिकाही निर्णायक राहू शकते. केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांना भाजप रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकतो. शिंदे गटाकडून या मतदारसंघात लोकसभेला उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ भैया सामंत हेही इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार कुणाचा? याची उत्सुकता राहणार आहे.
रायगड, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये 31 विधानसभेच्या आणि 7 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या भागामध्ये 7 महापालिकेच्या, 2 जिल्हा परिषदांच्या महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. आता जाहीर झालेल्या शिक्षक मतदारसंघातील 35 हजार पैकी जवळपास 80 टक्के मते या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये दोन जिल्हा परिषदा, सात महापालिका निवडणुका तसेच नऊ नगरपालिकांच्या निवडणुका यासुद्धा राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या आहेत.
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीची आणि रायगडमध्ये शेकापची भूमिका निर्णायक असणार आहेत. ठाणे-कल्याण महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. मात्र, शिवसेनेत पडलेल्या फुटीचा परिणाम येत्या निवडणुकीत प्रतिबिंबित होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे, तर उल्हासनगर, भिवंडी, पनवेल या महापालिकांवरही भाजपच वर्चस्व दाखवू शकतो अशी स्थिती आहे.
– शशिकांत सावंत