समन्वयाच्या अभावामुळेच प्रकल्पग्रस्त-प्रशासनात संघर्ष

समन्वयाच्या अभावामुळेच प्रकल्पग्रस्त-प्रशासनात संघर्ष
Published on
Updated on

आजरा : विकास सुतार : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पात यंदा पाणी साठविण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, एकदा का प्रकल्पात पाणी साठले की, प्रकल्पग्रस्तांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, ते सुटणार नाहीत, असे प्रकल्पग्रस्तांना वाटते. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघू शकतो, हा विश्वास देण्यात प्रशासन कमी पडत आहे.

प्रकल्पग्रस्त व प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येतो. यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळेच बंदी आदेश झुकारून प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आरपारची लढाई लढताना दिसत आहेत.

गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी ठिय्या, मोर्चे, आंदोलने केली आहेत. यामुळे प्रशासनाने धरण परिसरात कलम 144 लागू केले आहे. धरण परिसरात संचारबंदी लागू केल्यामुळे प्रशासन दडपशाहीने प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रकल्पग्रस्तांचा समज झाला. यातून त्यांच्या प्रशासनाबरोबरच्या संघर्षाला खतपाणी मिळाले.

हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोठी तयारी केली. मात्र, प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विश्वास देण्यात प्रशासन कमी पडले. प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची वाट नेमके कशासाठी बघतेय, हा प्रश्नच आहे. कारण, ज्यावेळी प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतो, त्यावेळी प्रशासन काही प्रश्नांबाबत तोडगा काढते. तेच काम प्रशासनाने आंदोलनाच्या अगोदर केले तर प्रकल्पग्रस्त आंदोलन करणारच नाहीत. चाफवडेतील 150 घरांच्या नुकसानभरपाईच्या कार्यवाहीची मागणी प्रकल्पग्रस्त गेली दोन महिने करीत आहेत.

मात्र, सोमवारी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरल्यावर त्याबाबतची उपाययोजना प्रशासनाने केलेली दिसते. असाच प्रकार जमीन सपाटीकरण, उजव्या तीरावरील रस्ता याबाबत दिसून येते. मागील अनेक अनुभव गाठीशी असल्याने सोमवारी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रकल्पग्रस्तांशी समन्वय साधून त्यांचे प्रश्न सटू शकतात, असा विश्वास प्रशासनाने त्यांना देण्याची गरज आहे.

उचंगी, सर्फनालाचे काम रखडले

आजरा तालुक्यात चित्री, चिकोत्रा, आंबेओहोळ, उचंगी, सर्फनाला या प्रकल्पांचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यातील चित्री, चिकोत्रा व आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण होऊन त्यात पाणीसाठा झाला आहे, तर उचंगीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्फनाला प्रकल्पाचे कामही अद्याप रखडले आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा व त्यांचा संघर्ष तालुक्याने अनुभवला आहे. या संघर्षात अनेक पिढ्या बरबाद झाल्या आहेत. तसेच प्रकल्पांच्या मूळ किमतीत अनेक पटींनी वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news