सटवाईच्या शेंदरातून मोकळी झाली ‘पत्रलेखिका’

सटवाईच्या शेंदरातून मोकळी झाली ‘पत्रलेखिका’
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : माणसांनी शेंदूर फासला की दगडाचा देव होतो आणि मग हाच शेंदूर खरवडून काढणे माणसांच्या हाती उरत नाही. आपणच फासलेला शेंदूर काढून दगड उघडा करणे हे माणसाच्या ताकदीपलीकडचे होऊन बसते.पण उस्मानाबादच्या माणकेश्‍वरमध्ये वेगळा अनुभव आला. हीच सामान्य माणसे फासलेला शेंदूर काढायला तयार झाली आणि शेंदूर लेपात कित्येक वर्षे लुप्त झालेली नितांत सुंदर 'पत्रलेखिका' समोर आली.

कालपर्यंत सटवाई म्हणून जिची पूजा केली ती पत्रलेखिका असल्याचा साक्षात्कार याची देही याची डोळा झाला आणि आता उठसूठ पूजा करणारे हातही थांबले आहेत. सटवाईची शेंदूरमुक्ती होऊन पत्रलेखिकेचे दर्शन घडल्याची आनंदवार्ता भारतीय माहिती सेवेतून अलिकडेच निवृत्त झालेले ज्येष्ठ अधिकारी आणि अभ्यासक शाहू पाटोळे यांनी शनिवारी फेसबुकवर दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणकेश्वर येथे चालुक्यकालीन 'होयसळ' पद्धतीचे अप्रतिम शिल्प असलेले शिवमंदिर आहे. या मंदिराला लागूनच सटवाईचे मंदिर आहे. तिला माणकेश्वरची आई असेही म्हणतात. सटवाई हे अनेकांचे कुलदैवत आहे. होयसळच्या सटवाईला गेल्यावर सटवाईच्या मूळ ठाण्यावर जाण्यापूर्वी शिवमंदिराच्या एका शिल्पाची पूजा करणे महत्वाचे होते. मंदिराच्या नैर्ऋत्येस असलेल्या त्या शेंदूर लावलेल्या मूर्तीला 'कोपरी आई' म्हणतात आणि तिची पूजा करण्याला 'कोपरी पूजा'. त्या संदर्भातील आख्यायिका अशी आहे की,'एक बाई एकटीच छोट्या बाळाला आईच्या पायांवर घालण्यासाठी घेऊन गेली होती. तिने बाळ खाली कोपरी आईसमोर झोपवून पूजा केली आणि ती परिक्रमेसाठी निघाली. तेव्हा तिच्या मनात कुशंका आली की,माझं बाळ एकटंच आहे, तिला देवीनं गिळलंबिळलं तर? ती परिक्रमा करून आली तर, खरंच देवीने बाळ गिळलं होतं,बाळाचा फक्त कोपर देवीच्या तोंडातून बाहेर
दिसत होता.बाळाच्या आईने ते पाहताच देवी आहे त्या अवस्थेत स्थिर झाली.

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख माया शहापूरकर-पाटील
यांनी 1991 साली त्यांच्या एका पुस्तकात या कोपरी आईचा उलगडा केला. ही कोपरी आई किंवा सटवाई नसून 'पत्रलेखिका'चे शिल्प असल्याचे त्यांनी म्हटले तसे त्यांनी पुरातत्व खात्याला सांगितले. गावकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून या शिल्पावरील शेंदूर काही काढता आला नाही. पण पुरातत्व अधिकार्‍यांनीही प्रयत्न सोडले नाहीत. अखेर माणकेश्वरच्या गावकर्‍यांची समजूत काढण्यात पुरातत्व खात्याला यश आले आणि शेवटी गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी 'पत्रलेखिकेचे' शिल्प शेंदराच्या लेपातून
मोकळे झाले.

शाहू पाटोळे म्हणतात, बहुजन समाजाची एकमेव साक्षर देवता सटवाई खरोखरच नशीब लिहिते की नाही, हे माहीत नाही, पण या
शिल्पातील सुंदरी काहीतरी लिहिताना दिसते. बहुजनांच्या बुद्धीवर अंधश्रद्धेची चढलेली पुटं ज्या दिवशी ते स्वतः शेंदरासारखी खरवडून
काढायला सुरुवात करतील, तेव्हा खर्‍या सामाजिक परिवर्तनाला सुरुवात होईल!

शाहू पाटोळे यांच्या पोस्टमुळे शेंदरातून बाहेर आलेल्या पत्रलेखिकेचे दर्शन घडताच इतिहासात रूची असलेल्यांसाठी ती पर्वणीच ठरली. पाटोळे यांच्या पोस्टवर मग अधिक माहिती देणार्‍या प्रतिक्रिया सुरू झाल्या. अनेकांकडे त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्राचीन मंदिरात भेटलेल्या अशाच पण शेंदरात लुप्‍त न झालेल्या, मंदिरांच्या दरांवरच विराजमान पत्रलेखिकांची माहिती दिली.
आणखी काही पत्रलेखिका प्रल्हाद लुलेकर म्हणाले, असेच पत्र लिहिणारी अभिसारिका बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे असलेल्या मध्ययुगीन आणि चालुक्यशैलीतील केदारेश्‍वर मंदिरावरही आहे. या शिल्पांचे तथ्य संशोधनातूनच बाहेर येऊ शकते. शिक्षण मिळालेल्या बहुजनांनी हे संशोधन भावनिक अस्मिता बाजूला ठेवून स्वीकारले पाहिजे. त्या त्या भागातील संशाधकांनीही संशोधन केले पाहिजे. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरची पत्रलेखिकाही या निमित्ताने भेटीस आली. परभणीच्या धारासूरमध्ये गुप्‍तेश्‍वर मंदिरावरही
पत्रलेखिका विराजमान आहे. विदर्भात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शीमध्ये मार्कंडा मंदिरातही पत्रलेखिका भेटते. अशी अनेक उत्तमोत्तम शिल्पे शेंदराच्या पुटांखाली गुदमरलेली आहेत. अंधश्रध्देची ही पुटे खरवडली गेली पाहिजेत. तसे झाले तर मग सामाजिक इतिहासाची पुनर्मांडणी होईल, असा विश्‍वासही या प्रतिक्रियांमधून उमटला.

सटवाई ही शाक्त पंथातील असून ती सप्तमातृकांपैकी आहे. सटवाईची पूजाअर्चना पद्धती पूर्णपणे शाक्त पद्धतीची आहे, इतर देवतांसारखी रूढ पूजापद्धती नाही. सटवाई अर्थात षष्ठी ही जन्मानंतर पाचव्या दिवशी मध्यरात्री येऊन बाळाच्या कपाळावर त्याचे
भविष्य लिहिते असे म्हणतात.'सटवीचा टाक' असा त्याचा उल्लेख केला जातो. मात्र असा कोणताही टाक लिहिणारी ही सटवी नव्हे. हे
सिद्ध होण्यासाठी या पत्रलेखिकेला किती वर्षे थांबावे लागले असेल? भारतातील प्राचीन मंदिरांवर सुंदरींची अनेक शिल्पे आढळतात. खासकरून मध्ययुगीन आणि मौर्य काळानंतरच्या मंदिरांमध्ये या सुंदर्‍या दिसतात. दर्पिणी, डालांबिका, पद्मगंधा, केतकीभरणा, मातृका,
चामरी, नर्तकी, शुकसारिका, शुभगामिणी अशा नामावलीत पत्रलेखिकाही भेटते. त्रिभंग अवस्थेत उभी ही सुंदरी हातातील बोरूने
भुर्जपत्रावर लेखन करताना आढळते. ती कुणाला पत्र लिहीत आहे यावरून अनेक सोयीचे अर्थ आजवर लावले गेले. त्यावरून
वाद नाही. मात्र, शेंदरात जखडून जबरदस्तीचे देवत्व असे किती पत्रलेखिकांच्या नशिबी आले हा आता शोधाचाच विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news