संविधान दिन : संविधान हाच जगण्याचा मार्ग

संविधान दिन : संविधान हाच जगण्याचा मार्ग

Published on

भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. लोकशाहीची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडते तेव्हा लोकशाहीला आधार देणारा, ऑक्सिजन देणारा एक मार्ग म्हणून संविधान आहे. संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे. तोच नेमका विचार आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विविध छोटी-छोटी राज्ये होती. या राज्यांची मोट बांधणे आणि त्यांच्यात आपण सगळे एक आहोत ही संकल्पना रुजवून नव्या आकांक्षा निर्माण करणे ही बाब भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. लोकशाही प्रत्यक्षात आणण्यामध्ये संविधानाचा फार मोठा वाटा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सामाजिक न्याय आणि विषमताविरोधी वागणूक, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूलभूत हक्कांची चौकट तयार केली. यामधून सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे, हा एक आशावाद तयार केला.

शासन यंत्रणेच्या माध्यमातून व्यवस्थानिर्मितीचे काम संविधानाने केले. कारण, धर्मसंस्था आपल्या भावनांवर आधारित असतात. त्याचा प्रमुख कोणी एक नसतो. निरनिराळे लोक त्याचे प्रमुख असतात. भारतामध्ये वेगवेगळे धर्म मूळ धरून राहणारे आहेत. त्याचप्रमाणे संविधान आणि त्यातील लोकशाहीचे तत्त्व मूळ धरून राहण्यासाठी शासन ही एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा अथवा व्यवस्था माणसांकडूनच कार्यान्वित आणि संचलित होत असते, तरीही या जिवंत माणसांकडून म्हणजेच व्यवस्थेकडूनही अन्याय, अत्याचार होऊ शकतो. हे ओळखूनच संविधानाने त्यांना काही जबाबदार्‍या आणि कर्तव्ये दिलेली आहेत. या व्यवस्थेतील कोणीही हुकूमशाही पद्धतीने वागू शकणार नाही, यासाठीची ही रचना आहे. म्हणूनच संविधान हा लोकशाही जिवंत ठेवणारा एक महत्त्वाचा ऑक्सिजन आहे, असे म्हणू शकतो. अब्राहम लिंकननी लोकशाहीबाबत 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही' असे म्हटले होते. महात्मा गांधींनी त्याला एक मापदंड जोडला होता. शंभरपैकी एकाचे मत जरी वेगळे असले, तरी त्याला ते व्यक्त करता आले पाहिजे आणि इतर 99 जणांनी त्याला अभयदान दिले पाहिजे. कारण, तो ते वेगळेपण घेऊन जगत आहे. हा लोकशाहीचा आशय आहे. इंदिरा गांधींनी 19 महिन्यांची आणीबाणी लावली तेव्हा तो आशय हरवला. प्रत्यक्ष हुकूमशाहीचा प्रयोग म्हणून त्या आणीबाणीकडे पाहिले जाते. त्या काळात प्रसारमाध्यमांवर दडपण आणले. त्यातून तो आशय हरवत गेला; पण त्या 19 महिन्यांच्या आणीबाणीतून बरेच काही शिकलो. म्हणूनच इतकी वर्षे आपण अखंडित आणि मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून उभे आहोत. अलीकडील काळात मात्र बहुमताच्या जोरावर एकप्रकारची हुकूमशाही राजवट समोर येताना दिसत आहे, तरीही त्यांना आपण लोकशाहीवादी असल्याचे दाखवावे लागत आहे. हीच लोकशाहीची ताकद आहे. ही ताकद संविधानाने दिलेली आहे. लोकशाही असो किंवा हुकूमशाही, त्याला लोकांची मंजुरी हवीच, अशा प्रकारची कल्पक रचना संविधानातून पुढे आली आहे. संविधानाला हुकूमशाही मान्य नाही; पण लोकांमार्फत संविधान राबवले जात असल्याने लोकांवरही जबाबदारी आहे. तथापि, ज्यांना संविधानाची अडचण वाटते, त्यांचा सामान्य माणसाने विचार कसा करायचा? आज केवळ डॉ. आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे म्हणून त्यापुढे आदराने मान झुकवणारे दिसतात. परिणामी, बाकीची जनता एका बाजूला आणि संविधान दिवस साजरा करणारा उत्साही जल्लोष दुसर्‍या बाजूला असे स्वरूप येऊ लागले आहे. मुळात अशा प्रकारचा जल्लोष करणे अयोग्य आहे. संविधान दिवसाच्या दिवशी राजकीय प्रक्रिया समजून घेऊन लोकशाही बळकट कशी करू शकतो याविषयी मुख्यतः विचार झाला पाहिजे; मात्र आपण त्याला उत्सवी स्वरूप देण्याच्या प्रयत्नात आहोत.

आपली लोकशाही एकमेकांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. संविधान हे एकमेकांच्या अस्तित्वाला महत्त्व देणारे आहे. राष्ट्रहिताला प्राधान्यक्रम देणारे आहे. जिवंत माणसाचे संविधान असल्या कारणाने राष्ट्रीय हित ही संकल्पना बाळबोध, भ्रामक अथवा काल्पनिक संकल्पना म्हणून स्वीकारली नाही. सर्वांचे सर्वसमावेशक विकासाचे सूत्र त्यातून स्वीकारले आहे. विकासाचे सूत्र हे एककल्ली, निवडक राहू शकत नाही. विशिष्ट समाजाचा विकास आणि उर्वरित वंचित, असे होऊ शकत नाही. सर्वांचा सर्वसमावेशक विकास अभिप्रेत आहे. म्हणूनच भारतीय हिताचा संविधानात समावेश करता कल्याणकारी व्यवस्था सांगण्यात आली आहे.

सतत निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणार्‍या लोकांना दर पाच वर्षांनी का होईना, लोकांसमोर यावे लागते. निवडणूक जिंकून दाखवावी लागते. त्यामध्ये काही त्रुटी असल्या, तरीही सारांशाने आणि सरकारने विचार करायचा झाल्यास निवडणुका बर्‍या वातावरणात पार पडत आहेत. पाच वर्षांनी लोकांसमोर जावे लागणे यातूनही लोकशाही जिवंत राहिली आहे. कारण, कितीही उन्माद, अरेरावी केली तरीही शेवटी जनताच सार्वभौम आहे, हे राजकीय पक्षांना ज्ञात आहे. चांगली वर्तणूक ठेवण्याची सक्ती आहे. भारतीय संविधान नसते, तर ही नैतिक सक्ती राहिली नसती आणि लोकशाही कधीच संपून गेली असती. समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही भारतीय संविधानाची जीवनरेषा आहे. लोकशाही राष्ट्र असल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांची जोपसना करणे आपले काम आहे. भारतीय लोकशाहीने सामाजिक विचार आणि राजकीय निर्णय प्रक्रिया या दोन महत्त्वाच्या गोष्टी अंतर्गत प्रक्रियेने सुरू केल्या. राजकीय निर्णय प्रक्रिया ही सामूहिक आहे. संविधानातील सर्व प्रक्रिया त्याला पूरक म्हणून निर्माण झाल्या. भारतीय संविधान हे नैसर्गिक कल्पनांचे प्रतीक आहे. त्यावर पाश्चात्त्य प्रभाव असल्याची टीका होते; मात्र एवढ्या सर्वांना जोडून ठेवताना अनेक चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यकच होते. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. लोकशाहीची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडते, तेव्हा लोकशाहीला आधार देणारा, ऑक्सिजन देणारा एक मार्ग म्हणून संविधान आहे. त्यामुळे संविधान दिवस साजरा करताना आपल्याला कमी श्रमाने, कष्टाने लोकशाही मिळाली असली, तरीही संविधानाला आकार येण्यासाठी अनेक लोकांनी खस्ता खाल्ल्या आहेत. म्हणूनच भारतीय संविधानात प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांची काळजी घेतलेली आहे. राज्यघटना लवचिक असल्यामुळे अनेक लोकसमूहाचे अनेक प्रश्न आपण सामावून घेऊ शकलो; मात्र लवचिक असले, तरी ते विशिष्ट गटाला, व्यक्तीला मनाप्रमाणे वाकवता येणारे नाही. त्यामध्ये करण्यात येणारे बदल हे संविधानाची मूलभूत चौकट अबाधित ठेवूनच करू शकता, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. म्हणूनच देशाचे सर्व नागरिक संविधानाप्रती व्हायब्रंट असले पाहिजेत. संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे. तोच नेमका विचार आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news