

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शौचालय घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्यामुळे दाखल झालेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत दंडाधिकारी न्यायालयात सोमवारी गैरहजर राहिले. त्यामुळे शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी करत त्यांना 18 जुलैला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले.
संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू असतानाच खा. राऊत यांनी किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांच्यावर शौचालय प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकार्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. हा घोटाळा झाला असून एकूण 100 कोटींचा हा घोटाळा असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे.
खा. राऊत यांनी केवळ दहशत निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारे खोटे आरोप करून आपली बदनामी केल्याचा आरोप करून मेधा सोमय्या यांच्यावतीने अॅड. विवेकानंद गुप्ता, अनिल गलगली यांनी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आयपीसी कलम 499, 500 अंतर्गत खटला दाखल करून 100 कोटी अबु्रनुकसानीचा दावा ठोकला आहे. न्यायालयाने राऊत यांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत हे दिल्ली येथे असल्याची माहिती सोमय्यांच्यावतीने अड. विवेकानंद गुप्ता यांनी न्यायालयास दिली. त्यावर न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले.