श्वास कोंडणारा ‘गॅस गिझर’

श्वास कोंडणारा ‘गॅस गिझर’
Published on
Updated on

गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे नाशिक येथे सिनिअर वैमानिक रश्मी गायधनी यांचा मृत्यू झाला. अनेक घरात गॅस गिझर घरांत वापरला जातो; पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने असे अपघात होतात. गॅस गिझर वापरताना काय दक्षता घ्यावी याविषयी…

'एलपीजी' म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस. याचे अर्धवट ज्वलन झाल्याने यातून कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो. कार्बन मोनॉक्साईड हा रंगहीन, गंधहीन वायू असल्याने आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही. आपण नकळतपणे तो श्वासावाटे आत घेत राहतो. गॅस गिझरमधून अपघाताने बाहेर पडलेला हा वायू बाथरूममध्ये कोंडला जातो. कारण, बर्‍याच बाथरूमना वायुविजन नसते. सर्वसामान्यपणे जेव्हा आपण ऑक्सिजन नाकावाटे घेतो तेव्हा ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होते आणि नाकावाटे आत घेतलेला फुफ्फुसातील ऑक्सिजन या क्रियेमुळे रक्तवाहिन्यांतून पेशींपर्यंत नेला जातो. बाथरूममध्ये असलेली व्यक्ती जेव्हा अनावधानाने कार्बन मोनॉक्साईड हा वायू श्वसनावाटे आत घेते, तेव्हा तो रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग पावतो आणि कार्बोक्सिहिमोग्लोबीन तयार होते. कार्बन मोनॉक्साईड हा वायू हिमोग्लोबिनशी संयोग पावण्यात ऑक्सिजनशी स्पर्धा करतो आणि या स्पर्धेत तो ऑक्सिजनपेक्षा जवळपास तीनशे पट अधिक ताकदवान असतो. साहजिकच तो हिमोग्लोबिनला पटकन चिकटतो आणि त्यामुळे ऑक्सिजनला पेशींपर्यंत पोहोचण्याची संधीच मिळत नाही. शरीरातील पेशींना, अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. या स्थितीला 'हायपॉक्झिया' असे म्हणतात. हृदयाची कार्यक्षमता अचानकपणे कमी होते. मेंदूचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मेंदूच्या कामावर परिणाम होतो.

अशा स्थितीत सुरुवातीला त्या व्यक्तीस चक्कर येते, डोकेदुखी सुरू होते, प्रचंड थकवा येतो, घाम येतो, मळमळते, उलटी होते, श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो, छातीत धडधडते, कानात आवाज येतो, अस्वस्थ वाटते. आंघोळ करताना बर्‍याचदा बाथरूम पूर्ण बंद असते आणि कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण खूप जास्त असल्याने रुग्णाला काही समजायच्या आतच त्याची द़ृष्टी क्षीण होते. अपस्माराचे झटके येतात. रुग्ण बेशुद्ध होतो. काहीवेळा कार्डियाक अरेस्ट होतो, म्हणजेच हृदय बंद पडते. कार्बन मोनॉक्साईडमुळे 3 ते 5 मिनिटांत मानवाटा मृत्यू होऊ शकतो. वेळीच मदत मिळाली नाही किंवा वायुवीजन सुरू होऊन तिथे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही, तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून ही बाब महत्त्वाची आणि गंभीर आहे.

अशा व्यक्तीला वेळीच बाथरूम बाहेर नेले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले, तर पुढचे धोके टळू शकतात; पण व्यक्तीने बराच वेळ कार्बन मोनॉक्साईड श्वासावाटे आत घेतला असेल, तर त्याचा परिणाम मेंदूवर होतो. काही वेळा अर्धांगवायूसुद्धा होतो. गॅस गिझरमुळे उद्भवणार्‍या वैद्यकीय स्थितीला 'गॅस गिझर सिंड्रोम' असे म्हटले जाते.

बाथरूममध्ये अशी वायू गळती झाल्याचे वेळीच लक्षात आले, तर ताबडतोब बाहेर यावे. इतर कुणाला हे समजले, तर बाथरूममधील व्यक्तीला त्वरित बाहेर काढावे. अशा व्यक्तीला मोकळ्या हवेत न्यावे. आवश्यक वाटल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा आणि तातडीने रुग्णालयात दाखल करावे. गॅस गिझरमुळे धोका किंवा अपघात होऊ नये, असे वाटत असेल, तर तो बाथरूमच्या आत न लावता बाहेरच्या बाजूला लावावा. बाथरूम हे कोंदट नसावे. त्यालाही वायुवीजन असावे. शक्यतो एक्झॉस्ट फॅन बसवावा. बाथरूममध्ये आंघोळ करत असताना वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणे दिसली, तर ताबडतोब बाथरूम बाहेर यावे आणि मोकळ्या हवेत जावे. हिवाळ्यात अगदी गरम पाण्याने आंघोळ करायची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे गिझर सलग चालू ठेवला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या अपघातांची शक्यता हिवाळ्यात अधिक प्रमाणात असते.

– डॉ. अनिल मडके,
छातीरोग विशेषज्ञ, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news