

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शेती पंपाचे आणि इरिगेशन योजनांचे अवाजवी वीजबिल कमी झाले पाहिजे. सक्तीने वसुलीचे धोरण राबवले तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे नेते आणि आमदार अरुण लाड यांनी आज येथे बैठकीत दिला.
सांगली जिल्हा सहकारी पाणीपुरवठा संस्थांची बैठक येथील कामगार भवनमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. आ. लाड म्हणाले, मे 2020 पर्यंत आपण सर्व पाणीपुरवठा संस्थांची बिले प्रतियुनिट 1 रुपये 16 पैसे दराने भरत होतो. बाकी रक्कम सरकार अनुदान देत होते. जून 2020 पासून बिलावरील सर्व रक्कम संस्थांकडून वसूल करण्यात आली आहे. शासनाचे अनुदान बंद झाले आहे. आता ही रक्कम संस्थांना भरणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही ऊर्जामंत्र्यांना भेटलो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याबाबत सांगितले. त्यांनी फेरविचार करण्याचा शब्द दिला. प्रत्यक्ष त्यावर काही झालेले नाही. आता सवलतीची रक्कम आम्ही भरली नाही म्हणून थकबाकीसाठी वीज कनेक्शन तोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू असताना आम्ही कनेक्शन पुन्हा जोडण्यास भाग पाडले. सरकारने तीन महिन्यांची मुदत दिली, मात्र या काळात प्रश्न सुटला नाही. पुन्हा कारवाई सुरू होईल. त्याविरोधात रस्त्यावरचा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. शेतकर्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये. प्रसंगी महाराष्ट्रातील शेतकरी पंजाब, हरियाणातील शेतकर्यांनी जे केले, तेच करतील.
शेट्टींची लढाई कुठे आहे
आ. लाड म्हणाले, "ऊस दरासाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी या विषयात रस्त्यावरची लढाई कुठे करत आहेत. रात्रीची नको, दिवसाची वीज द्या, अशी त्यांची मागणी आहे. आम्ही म्हणतोय, रात्री तरी वेळेत वीज द्या."
आता कोणाची ताकद बनायचे नाही
आ. लाड म्हणाले, राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे नेते संग्राम देशमुख यांना त्यांच्या धोरणाने चालू द्या. आम्हाला आता कुणाची ताकद बनायचे नाही, कुणासोबत जायचे नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत मात्र पलूस व कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच दाखवली जाईल.