

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंचा विजय झाल्याने खडसे समर्थकांनी फलकबाजी करून फटाक्यांची अतषबाजी केली, तर मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात टरबूज फोडून जल्लोष करीत मुक्ताईनगर शहरात आ. चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर फटाके फोडल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव दूर करण्यात आला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला असून, या निकालाने मुक्ताईनगरला दोन आमदार मिळाले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. मात्र, मुक्ताईनगर मतदारसंघात या दोन्ही पक्षांमध्ये विळा-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये एकनाथ खडसे निवडून आल्यानंतर खडसे समर्थकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानालगत जल्लोष करीत फटाके फोडले.
त्यामुळे तत्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात फटाके फोडून डीजे लावून गुलाल उधळून खडसे समर्थकांनी जल्लोष व आनंद व्यक्त केला. परंतु, याच ठिकाणी आ. चंद्रकांत पाटील व आ. एकनाथ खडसे यांचे समर्थक समोरासमोर आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा तणाव निवळला.
मुक्ताईनगरात फोडले टरबूज
माजी मंत्री एकनाथ खडसे हे निवडून येणारच, असा ठाम विश्वास असल्याने खडसे समर्थकांनी सोमवारपासूनच मुक्ताईनगर येथील बसस्थानक परिसरात विजयाचे बॅनर झळकावले होते. त्यानंतर ते विजयी झाल्यानंतर समर्थकांनी प्रवर्तन चौकात टरबूज फोडून जल्लोष केला.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आ. एकनाथ खडसे तसेच आ. चंद्रकांत पाटील यांच्यात विळा-भोपळ्याचे सख्य असल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही तशाच प्रकारची भावना आहे.
त्यामुळे विधान परिषदेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुक्ताईनगर शहरात भला मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. ज्यावेळी जल्लोष सुरू झाला, त्यावेळी दोन्हीही कार्यकर्ते समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक शेळके व पोलिस प्रशासनाने त्या कार्यकर्त्यांना विजयाचा जल्लोष संयमाने साजरा करण्याचे आवाहन केले होते.