

शिवसेना आणि ठाणे यांचे नाते स्थापनेपासूनचेच आहे. 1986 ला ठाणे महापालिकेवर पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आली आणि हे नाते अधिक घट्ट झाले. आज शिवसेना पूर्णपणे दुभंगलेली असताना शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव ज्यांच्याकडे आले, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कर्मभूमी ठाणेच आहे. तसेच नव्या शिवसेनेचे मुख्यालयही ठाणेच राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात पुन्हा एकदा ठाण्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
शिवसेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या केंद्रभूत हक्कांसाठी केली. 19 जून 1966 ला स्थापन झालेली ही संघटना 1985 पासून राज्यव्यापी झाली, तरी शिवसेनेचे केंद्र मुंबईच राहिले. 1966 ते 1994 दरम्यान विरोधी पक्षात राहून शिवसेनेने सत्तारूढ काँग्रेसला 'सळो की पळो' करून सोडले. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे, दत्ताजी साळवी, प्रमोद नलावडे, प्रमोद नवलकर, ऍड. लीलाधर डाके, मनोहर जोशी, सुधीर जोशी, मधुकर सरपोतदार, गजानन कीर्तिकर, सुभाष देसाई अशी लढवय्या नेत्यांची नावे होती. शिवसेना नेत्यांना एक वजन होते. या संघटनेची रचना शाखाप्रमुख ते शिवसेना नेता अशी होती. काळानुरूप नवीन नेतेही पुढे आले. यानंतरच्या लढवय्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास कदम, गणेश नाईक, राज ठाकरे अशी प्रखर लढ्यातील नावे होती. त्यानंतर एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आनंद अडसूळ, आढळराव पाटील, भावना गवळी अशी लढवय्या नेत्यांची तिसरी फळीही तयार झाली. शिवसेना ही अधिक ताकतीने उभी राहतेय, असे चित्र ज्या-ज्यावेळी त्या-त्यावेळी या संघटनेला बंडाचा सामना करावा लागला. या संघटनेत पहिले बंड झाले ते छगन भुजबळांचे.
त्यावेळी शरद पवार यांच्याच पाठिंब्याने भुजबळांनी बंड केले. 10 ते 12 आमदार फोडले. नागपूर अधिवेशनात हा खेळ रंगला; पण शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला नाही. पुन्हा एकदा शिवसेना ताकतीने उभी राहिली आणि 1995 ला राज्यात सत्तेवरही आली; मात्र 2002 नंतर नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे असे मातब्बर नेते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते. त्यामुळे हे बंडसुद्धा सेनेने पचवले. 2014 ला 62 जागा जिंकून शिवसेना भाजपच्या जोडीने पुन्हा एकदा सत्तेत आली; मात्र आता ठाणेकरांच्या बंडानंतर हे चित्र पालटले. याच ठाण्यामध्ये आता नव्या शिवसेनेचे मुख्यालय झाले आहे. अनेक बंडांना पुरून उरलेल्या शिवसेनेला आताचे बंड मात्र याच संघटनेच्या मुळावर आल्याने या संघटनेची स्थिती निस्तेज झाली आहे.
आज शिवसेनेचे धनुष्यबाण आणि नाव ठाकरेंच्या हातून निसटले आणि शिंदेंना मिळाले. शिवसेनेच्या स्थापनेपासून असलेल्या नेत्यांमधील पहिल्या फळीतील नेत्यांमधील गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ आज शिंदेंकडे आहेत. दुसर्या बाजूला दुसर्या फळीतील रामदास कदम, आढळराव पाटील अशी नेतेमंडळी शिंदेंकडे आहे. तिसर्या फळीतील उदय सामंत, दीपक केसरकर, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई अशी नेतेमंडळी शिंदे यांच्याकडे आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे सद्यस्थितीला आदित्य ठाकरे या युवा चेहर्याबरोबर अरविंद सावंत, संजय राऊत, भास्कर जाधव, लीलाधर डाके, चंद्रकांत खैरे अशी काही मोजकी मंडळी उरली आहेत. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही शिंदेंच्या नेतृत्वाखालीलाच असल्याचा निकाल दिल्यानंतर साहजिकच शिंदेंच्या समर्थकांच्या अंगातील बळ दुप्पट वाढले आहे. दुसर्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाजूने उरलेल्या नेत्यांसमोर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही सामर्थ्य दाखवू, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. सध्यातरी दुभंगलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर कोकणात चर्चा होत आहे. कारण, कोकणला शिवसेनेने भरभरून यश दिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर चौदा आमदार, चार खासदार निवडून आलेले आहेत. त्यात आता शिंदेकडे 11 आमदार आणि 3 खासदार आहेत. ठाकरेेंकडे 3 आमदार आणि 1 खासदार आहे. या शक्तीवर पुढची लढाई दोन्हीकडून लढली जाणार आहे; मात्र याचा केंद्रबिंदू आता ठाणेच राहणार आहे. याचे कारण मुख्यंमंत्री एकनाश शिंदे यांची राजकीय कर्मभूमी ठाणे आहे.
– शशिकांत सावंत