शिक्षक भरती घोटाळा : अर्पिताकडे 20 कोटी, मोनालिसाकडे 10 फ्लॅट

शिक्षक भरती घोटाळा : अर्पिताकडे 20 कोटी, मोनालिसाकडे 10 फ्लॅट
Published on
Updated on

कोलकाता : वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरी 20 कोटींहून अधिक रोख रक्कम आढळल्याने याप्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

अर्पिता मुखर्जीही वादाच्या भोवर्‍यात

ईडीच्या छाप्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अर्पिता मुखर्जी यांनी बंगाली चित्रपटसृष्टीत भूमिका केल्या आहेत. मात्र, त्यांच्या वाट्याला प्रामुख्याने सहअभिनेत्रीच्या भूमिकाच आल्या. आता ईडीच्या छाप्यात 20 कोटींची रोकड त्यांच्याकडे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने केलेल्या दाव्यानुसार 2016 साली उजेडात आलेल्या या शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान अर्पिता मुखर्जीचा सहभाग समोर आला आहे. तसेच भाजप नेते अग्निपॉल मित्रा यांनी अर्पिता ह्या पार्थ यांची खास मैत्रीण असल्याचा आरोप केला आहे. आता तर तृणमूल काँग्रेसने अर्पिताचा आमच्या पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, सार्वजनिक कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी याच अर्पिताचे कौतुक केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात तृणमूलचा पाय खोलात चालला आहे.

मोनालिसा दासही ईडीच्या रडारवर

अर्पिता सध्या ईडीच्या ताब्यात असून पार्थ चॅटर्जी यांची आणखी एक जवळची सहकारी मोनालिसा दास यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा दावा भाजपने केला आहे. मोनालिसा दास या एक शिक्षिका असून त्या पार्थ यांच्या जवळच्या असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. दास यांच्याकडे 10 फ्लॅट आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी, असेही घोष यांनी म्हटले आहे. दास यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडी लवकरच या प्रकरणी मोनालिसा यांचीही चौकशी करू शकते.

कोण आहेत पार्थ चॅटर्जी?

* पार्थ चॅटर्जी हे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याचे मंत्री
* ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख
* 2001 पासून सलग पाच वेळा विधानसभेवर निवड
* 2016 पासून पश्चिम बंगालमध्ये शिक्षणमंत्री म्हणूनही काम
* याच काळात बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याची सुरुवात
* चॅटर्जी हे उच्चशिक्षित असून एमबीए केल्यानंतर काही काळ बहुराष्ट्रीय कंपनीत काम
* सर्वप्रथम 2011 साली कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती
* 2016 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण खात्याचा कार्यभार
* 2012 मधील निवडणुकीनंतर पुन्हा वाणिज्य आणि उद्योग खात्याचे मंत्री
* ईडीच्या कारवाईमुळे राजकीय भवितव्य टांगणीला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news