

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शालेय पोषण आहारात गुळाचा समावेश आणि गुर्हाळघरांच्या समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिली. शासकीय विश्रामगृहावर शिवसेना पदाधिकार्यांशी त्यांनी संवाद साधला.
जिल्ह्यात सुमारे 1,200 गुर्हाळघरे होती. मात्र, सध्या 280 गुर्हाळघरे कशी तरी चालू आहेत. विविध जाचक अटी, अन्न व औषध प्रशासनाचा त्रास, कर्नाटकातून येणारा गूळ आणि उत्पादकाला मिळणारा भाव, या सर्वांचा विचार करता गुर्हाळघरे चालवणे अडचणीचे होत असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. गुळाचा शालेय पोषण आहारात समावेश केल्यास उत्पादकांना त्याचा फायदा होईल, असेही सांगण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत तातडीने बैठक घेऊ, असे भुसे यांनी सांगितले.
ठिबक सिंचनसाठी राज्य शासनाने अनुदान घोषित केले आहे, त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवा. जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कृषीविषयक 24 व्यवसायांना अर्थपुरवठा केला जातो, त्याची व्यापक जागृती करावी. विजय देवणे म्हणाले, शासनाच्या योजनांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, स्वखर्चाने क्षारपड जमीन दुरुस्त केलेल्या शेतकर्यांना अनुदान द्यावे.
आजरा-चंदगड परिसरात हत्तीच्या उपद्रवाने कृषी औजारांचेही नुकसान होत आहे, त्याची भरपाई द्यावी. दिवसा आठ तास वीज द्यावी, वनऔषधी प्रकल्पांना गती द्यावी. तालुकानिहाय माती परीक्षण संस्था सुरू कराव्यात, आजरा घनसाळ, काळा जिरगा तांदळाच्या वाणांचे संवर्धन करावे, प्रामाणिक कर्जफेड करणार्या शेतकर्यांना अनुदान द्यावे आदी कृषीसंदर्भातील विविध मागण्या यावेळी पदाधिकार्यांनी केल्या. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सुजित मिणचेकर, बाजीराव पाटील, युवराज पवार, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.