शरद पवार म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देशाला राजकीय, आर्थिक स्थैर्य दिले

शरद पवार म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देशाला राजकीय, आर्थिक स्थैर्य दिले

Published on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली हे आपण जाणतोच. पण ते त्यापलीकडे एक अर्थशात्रज्ञ होते, थोर अभ्यासक होते. त्यांच्या दूरद‍ृष्टीमुळेच देशाला राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळाले. पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याची संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाक्रा नानगल धरण उभारल्यानंतर पाण्यातून वीज निर्मिती करून ती वीज कुठल्याही भागात पाठवता येऊ शकते, ही संकल्पना बाबासाहेबांच्या प्रेरणा व संकल्पातून सत्यात उतरली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांना डॉ. आंबेडकर आदर्श मानत. असेही पवार म्हणाले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम हाती घेतले. शैक्षणिक, उद्योग, नोकर्‍या आदी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून ते विभागाला एका उंचीवर नेण्याचे काम करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

लंडनमध्ये बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले घर राज्य सरकारने तेथील स्थानिक शासनाकडून विकत घेतले आहे. त्याठिकाणी भव्य संग्रहालय व्हावे यासाठी निधीची मागणी धनंजय मुंडे व विश्‍वजित कदम यांनी केली होती. त्यानुसार या कामासाठी पंधरा कोटी रुपये निधी मंजूर केला असून, तेथील शासनाशी समन्वय साधून हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

इंदू मिल येथील बाबासाहेबांचे स्मारक राज्य सरकार वेळेत पूर्ण करेल. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेही भाषण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news