

शरीराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 आवश्यक आहे. अनेकदा बी-12 जीवनसत्त्व कमी होऊ लागताच अनेक आजारपण येतात. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता यामुळे मेंदू आणि नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास अडचणी येऊ शकतात.
व्हिटॅमिन बी-12 च्या अभावामुळे आजारपणही येते. गर्भधारणेच्या काळात व्हिटॅमिन बी-12 ची खूपच गरज असते. दुसरीकडे व्हिटॅमिन बी-12 चे प्रमाण चांगले असल्यास वृद्धापकाळात होणारा डिमेन्शियाचा त्रास कमी राहतो. व्हिटॅमिन बी-12 च्या अभावामुळे हाडे आणि सांधेजोडाशी संबंधित समस्या निर्माण होते. त्याचवेळी शरीरात अॅनिमियाचा धोका देखील वाढतो.
लक्षणे कोणती?
त्वचा पिवळी पडणे, जिभेवर फोड येणे किंवा लालसरपणा वाढणे, तोंड येणे, डोळ्यांची शक्ती कमी होणे, नैराश्य, अशक्तपणा आणि सुस्तपणा वाढणे, दम लागणे, डोकेदुखी आणि कानात आवाज येणे, भूक कमी लागणे.
व्हिटॅमिन बी 12 च्या अभावामुळे होणारे आजार
डिमेन्शिया : वाढत्या वयामुळे लोकांमध्ये विसरभोळेपणा वाढतो. यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता. शरीरात व्हिटॅमिन-12 चा अभाव राहिल्याने मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजारही बळावतात. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे डिमेेन्शियाचा आजार वाढतो. हा आजार झाल्यास आपली विचारशक्ती कमी होते.
अॅनिमिया : बी-12 जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी झाल्यास अॅनिमियासारखा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. कारण, याच्या अभावाने शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्याचे प्रमाण घटते. अशा स्थितीत हिमोग्लोबिनदेखील कमी होऊ लागते आणि अॅनिमिया होण्याची भीती राहते. वेळीच उपचार न केल्यास आजारपण बळावण्याचा धोका असतो.
सांधेजोड आणि हाडांचे दुखणे : व्हिटॅमिन बी-12 हे शारीरिक हालचाली योग्य ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्याची कमतरता निर्माण झाल्यास हाडांचे दुखणे, कंबर आणि पाठीचे दुखणे देखील उद्भवण्याची शक्यता वाढते.
मानसिक आजारपण : बी-12 हे व्हिटॅमिन आपल्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करणारे असते. याचे प्रमाण कमी झाल्यास विसरण्याची आणि संभ्रमात राहण्याची समस्या निर्माण होऊ लागते. अनेकदा या समस्येकडे लोक फारसे गांभीर्याने पाहात नाहीत. परंतु, अधिक काळापर्यंत ही समस्या राहणे योग्य नाही. यासाठी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा.
नर्व्ह सिस्टीमला हानी : बी-12 चा अभाव झाल्यास शरीरातील प्रत्येक भागात रक्तपुरवठा होण्यास अडचणी येऊ लागतात. याखेरीज पोटाशी संबंधित आजारपणदेखील होऊ शकते. याशिवाय पचनाची समस्या, बद्धकोष्टता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवतींमध्ये बी-12 ची कमतरता निर्माण झाल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो.
बाळाचा विकास आणि बाळंतपणावेळी होणार्या समस्येत भर पडू शकते. स्तनदा मातांच्या शरीरात हे जीवनसत्त्व पुरेसे नसल्यास बाळाचे पोषण योग्यरितीने होत नाही. या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो. जखमा भरण्यास विलंब होणे, केस गळणे, नखांशी निगडित विकार होण्याचा धोका राहतो.
अन्य समस्या : याशिवाय अन्य काही समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसभर थकवा जाणवेल. तसेच अशक्तपणा, चिडचिडेपणा वाढतो. अनेकदा हात-पायांना मुंग्याही येतात. व्हिटॅमिन बी-12 कमी असल्यास तोंड येणे, अपचन आणि अतिसार देखील होऊ शकतो.
डॉ. मनोज कुंभार