व्यक्‍तिविशेष : कारस्थानी लष्करशहा

व्यक्‍तिविशेष : कारस्थानी लष्करशहा
Published on
Updated on

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) :

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या राजवटीत पाकिस्तानचे भारताशी संबंध अडचणीचे आणि विचित्र राहिले. सत्तेत असताना मुशर्रफ यांनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्यासपीठावर काश्मीर प्रश्न उगाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात अवास्तव धाडस दाखविण्याची खुमखुमी होती आणि ती आपल्याला कारगिल युद्धावेळी दिसली.

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष, लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे 5 फेब्रुवारी 2023 रोजी निधन झाले. वास्तविक, 1999 मध्ये कारगिलचे युद्ध घडवून आणणारे लष्करशहा अशी त्यांची ओळख. आपल्या राजवटीत त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याचा आव आणला. याच विश्वासाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना आग्रा भेटीचे निमंत्रण दिले; पण व्हायचे तेच घडले. बैठकीतून मुशर्रफ निघून गेले आणि उभय देशांतील शांतता वार्ता निष्फळ ठरली.

परवेज मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी दिल्लीत झाला. भारत आणि पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानात स्थलांतरित झाले. 1965 च्या भारत आणि पाकिस्तान युद्धावेळी ते सेकंड लेफ्टनंट होते. युद्ध समाप्तीनंतर ते पाकिस्तानच्या प्रतिष्ठेच्या 'स्पेशल सर्व्हिस ग्रुप' (एसएसजी) मध्ये रुजू झाले. 1966 ते 1982 या कालावधीत ते कार्यरत होते. एवढेच नाही, तर ते दुसर्‍या भारत आणि पाकिस्तान (1971) युद्धातही होते. पश्चिम पाकिस्तान (आताचा बांगला देश) मध्ये 'एसएसजी' कमांडो बटालियनमध्ये असावेत.

मुशर्रफ यांनी 1965 आणि 1971 च्या युद्धाचे वर्णन 'आयुष्यातील महत्त्वाचे क्षण' असे केले आहे. या युद्धातील पराभवाने मुशर्रफ यांना खूपच मानसिक धक्का बसला आणि त्यांनी कोणत्याही स्थितीत बदला घेण्याचे ठरवले. 1984 आणि 1987 रोजी त्यांनी सियाचीनमध्ये कुरापती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय जवानांच्या सजगतेने त्यांचा डाव हाणून पाडला. मुशर्रफ हे मार्च ते मे 1999 या काळात पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनले आणि ही त्यांच्यासाठी संधी होती.

भारतीय हद्दीतील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कारगिलवर ताबा मिळवण्यासाठी मुशर्रफ यांनी 'फाईव्ह नॉर्दन लाईट इन्फंट्री बटालियन'ला सज्ज केले आणि स्थानिक बलुच आणि दहशतवाद्यांच्या मदतीने हल्लाबोल करण्याचे फर्मान काढले. पाकिस्तानच्या सैनिकांनी दहशतवाद्यांच्या वेशातून भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि त्यांनी सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कारगिल हिलवर ताबा मिळवला. जाट रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी पकडले आणि त्यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले. मात्र, या घुसखोरीतून नामानिराळे राहण्यासाठी त्यांनी शक्कल लढवण्याचे ठरविले. ते 'आयएसआय'च्या प्रमुखासह चीनला रवाना झाले. मुशर्रफ यांनी ही कुरापत स्थानिक दहशतवाद्यांनी केल्याचे सांगून यात पाकिस्तानी सैनिकांचा कोणताही हात नसल्याचा दावा केला.

पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल हिलवर ताबा मिळवल्याचे समजल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय'ची आखणी केली आणि या चौकीला पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यातून मुक्त केले. मे ते जुलै 1999 या तीन महिन्यांत झालेल्या कारगिल युद्धात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सैनिकांना हुसकावून लावले. दुसरीकडे, पाकिस्तानकडून मात्र नकारघंटा सुरूच होती. स्थानिक काश्मीर दहशतवाद्यांशी भारताचे युद्ध झाल्याचा त्यांनी कांगावा केला. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या पाकिस्तानी सैनिकांकडील कागदपत्रे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान व जॉईंट चीफ ऑफ स्टाफ यांनी पाकिस्तानचे सैनिक आणि निमलष्कर या घुसखोरीत सामील असल्याचे मान्य केल्याने मुशर्रफ यांचा खोडसाळपणा जगासमोर आला. भारतीय हवाईदलाने पाकिस्तानने बळकावलेल्या चौक्या पुन्हा मिळवल्या. यादरम्यान आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी सैनिकांना कारगिलमधून माघारी परतण्याचे आदेश दिले. हा आदेश मुशर्रफ यांच्या संतापात भर घालणारा ठरला.

पराभवामुळे आणि माघारीमुळे पाकिस्तानी सैनिक अधिकारी आणि मुशर्रफ यांच्यात वाद पेटला. पाकिस्तानचे नौदल आणि हवाईदलप्रमुख अ‍ॅडमिरल बुखारी आणि परवाईझ कुरेशी यांनी मुशर्रफ यांच्यावर कोर्ट मार्शल करण्याची मागणी केली. दुसरीकडे, चीफ ऑफ जॉईंट स्टाफ कमिटी लेफ्टनंट जनरल कुली खान यांनी मुशर्रफ यांच्या आत्मघाती धोरणावर सडकून टीका केली. पूर्व पाकिस्तान (आताचा बांगला देश) युद्धापेक्षा कारगिल युद्धात पाकिस्तानची मोठी नामुष्की झाली. कोणत्याही धोक्याचा अंदाज न घेता तसेच चुकीच्या तर्कावर केलेले चुकीचे नियोजन आणि चुकलेली रणनीती, यामुळे पाकिस्तानी सैनिकांना प्राण गमावावे लागले, अशा शब्दांत त्यांनी मुशर्रफ यांच्यावर ताशेरे ओढले.

12 ऑक्टोबर 1999 रोजी नवाज शरीफ यांनी मुशर्रफ यांना लष्करप्रमुखपदावरून निलंबित केले. ही वार्ता धडकत असतानाच मुशर्रफ यांचे विमान श्रीलंकेतून पाकिस्तानात उतरणार होते. त्याचवेळी त्यांनी आपल्या सहकार्‍यांना सोबत घेत पाकिस्तानातील विमानतळ आणि रेडिओ स्टेशन ताब्यात घेण्यासाठी रक्तहीन बंड घडवून आणले. चिडलेल्या मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या मुख्य कार्यकारीपदाचा ताबा घेतला आणि पंतप्रधानांना बरखास्त केले. 2001 मध्ये स्वत: अध्यक्ष म्हणून जाहीर केले. हे पद त्यांच्याकडे 2008 पर्यंत होते. त्यांच्या राजवटीत सुडाचे राज्य पाहावयास मिळाले.

देशातील विरोधक विशेषत: पंतप्रधानास अटक केली आणि सहा महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली. पाकिस्तानची घटना रद्दबातल केली आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध घातले. या कृतीने जनरल परवेज मुर्शरफ हे आपली लोकप्रियता टिकवण्यात अपयशी ठरले. ते लष्करी शक्ती आणि स्वार्थी धोरणाच्या आहारी गेले. अमेरिकेवर 9/11 चा हल्ला झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला उदारमतवादी इस्लामच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्धात ते सामील झाले. अफगाणिस्तानातील तालिबानचा बीमोड करण्यासाठी मुशर्रफ यांनी अमेरिकेच्या सैनिकांना पाकिस्तानची भूमी मोकळी करून दिली.

अर्थात, या निर्णयामुळे दीर्घकाळापासून पाठिंबा असलेल्या अफगाण तालिबानचा रोष पत्करावा लागला. या निर्णयाने दहशतवादी संघटना नाराज झाल्या. म्हणून स्थानिक दहशतवादी संघटनांनी मुशर्रफ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. नव्याने स्थापन झालेली दहशतवादी संघटना तेहरिक-ए-तालिबानने मुशर्रफ यांच्यावर किमान चारवेळा हल्ले केले. त्यात ते बालंबाल बचावले. मुशर्रफ यांनी आपल्या अमेरिकाधार्जिण धोरणाच्या बदल्यात पाकिस्तान सैनिकांसाठी अर्थसहाय्य पदरात पाडून घेतले. अण्वस्त्रसज्ज सैनिकांसाठी ही मदत आवश्यक असल्याचे मुशर्रफ यांना वाटत होते. त्याचवेळी पाकिस्तानी न्याय व्यवस्थेतून आणि प्रसारमाध्यमांतून मुशर्रफविरोधातील सूर तीव्र होत होते. शेवटी 2007 रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली.

अध्यक्ष असताना परवेज मुशर्रफ यांनी बांगला देशला भेट दिली. 29 जुलै 2002 रोजी त्यांनी ढाका येथे वॉर मेमोरियलला भेट दिली. तेथील नोंदीत मुशर्रफ म्हणतात की, 'आपण मनापासून बांगला देशला शुभेच्छा देतो. 1971 च्या घटनांच्या वेदना अजूनही मनावर कोरलेल्या आहेत. त्या दुर्दैवी काळात झालेले अत्याचार खेदजनक आहेत. आपण भूतकाळात घडलेल्या घटनांना दयेच्या भावनेतून विसरून जाऊया.' मुशर्रफ यांच्या भेटीनंतर बांगला देश आणि पाकिस्तान यांच्यातील कटुता कमी झाली. याचा परिपाक म्हणजे बांगला देशाने कट्टर इस्लामिक रूप धारण करण्यास सुरुवात केली. अर्थातच, ही बाब भारतासाठी डोकेदुखी ठरणारी होती. अध्यक्ष या नात्याने मुशर्रफ यांनी ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग पार्टी स्थापन केली. 2008 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. म्हणून त्यांनी पाकिस्तान सोडले. ते 2013 मध्ये पाकिस्तानला परतले. मात्र, ते अपात्र ठरल्याने त्यांनी लगेचच दुबईला बस्तान हलविले. देशावर बेकायदा आणीबाणी थोपविल्याबद्धल मुशर्रफ यांना 2014 मध्ये त्यांच्या गैरहजेरीत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. तीन वर्षांनंतर मात्र हा निकाल रद्द करण्यात आला.

कुशाग्र बुद्धीचे सैनिकी अधिकारी असलेल्या मुशर्रफ यांनी संपूर्ण देशाची सूत्रे मार्शल लॉ लागू न करता आपल्या हाती ठेवली. मात्र, राजकीय आघाडीवर ते सपशेल अपयशी ठरले. मुशर्रफ यांच्या राजवटीत भारताशी संबंध हे अडचणीचे आणि विचित्र राहिले. म्हणजे भारताचा प्रमुख शत्रू ते विश्वासपात्र वाटाघाटी करणारा व्यक्ती, अशी त्यांची भूमिका राहिली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात मुशर्रफ यांच्या भूमिकेत चढ-उतार पाहावयास मिळाले. सत्तेत असताना मुशर्रफ यांनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्यासपीठावर काश्मीर प्रश्न उगाळण्याचा प्रयत्न केला आहे. कारगिल युद्ध घडवणारा नेता असणार्‍या मुशर्रफ यांनी लाहोर कराराची पायमल्लीही केली. मुशर्रफ यांच्यात अवास्तव धाडस दाखविण्याची खुमखुमी होती आणि ती आपल्याला कारगिल युद्धावेळी दिसली. 1999 मध्ये सत्ता उलथवून टाकणे, पाकिस्तान घटनेचे नियम न पाळता सत्ता चालवण्याचे धाडस हा त्यांच्या खुमखुमीचा भाग. पाकिस्तानच्या सैनिक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात जात कारगिल युद्धाचे कारस्थान रचले आणि त्याची अंमलबजावणी केली. एकंदरीतच, कारगिल युद्धाने पाकिस्तानला बदलून टाकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news