

जयपूर; वृत्तसंस्था : देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी एक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली. अविकसित जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारने खास सुरू केलेल्या योजनेंतर्गत सुरुवातीच्या 3 टप्प्यांत संपूर्ण देशात 157 नवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली जाणार आहेत, असेही मोदी म्हणाले.
वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांतील त्रुटी, अडचणी दुरुस्त करण्याची प्रक्रिया सरकारच्या पातळीवर सुरू झालेली आहे. रुग्णांची सेवाशुश्रूषा आणि आजारांना प्रतिबंध या दोन्ही पातळ्यांवर सरकार काम करत आहे. आरोग्याचे एकूणच क्षेत्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली. आजार झाल्यानंतर उपचार आपण करतोच; पण आजार होऊच नये म्हणून आयुर्वेद आणि योग-प्राणायामाला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण राहिलेले आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.
राजस्थानातील जयपूर येथील पेट्रोरसायन प्रौद्योगिकी संस्थेच्या (सीआयपीईटी) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी राज्यातील बांसवाडा, सिरोही, हनुमानगड आणि दौसा जिल्ह्यांतून चार नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे भूमिपूजन केले.
7 वर्षांत 170 वर नवी वैद्यकीय महाविद्यालये
गेल्या 7 वर्षांत 170 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात सरकारला यश आले आहे. शंभरावर वैद्यकीय महाविद्यालयांचे काम वेगात सुरू आहे. देशात एकेकाळी 6 एम्स रुग्णालये होती. आज ही संख्या 22 वर गेली आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.
सुद़ृढ भारताच्या निर्मितीचा संकल्प
वीस वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा गुजरात राज्याची धुरा स्वीकारली, तेव्हा आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा प्राधान्याने मुकाबला केला. राज्याची या क्षेत्रातील परिस्थिती आता आमूलाग्र बदललेली आहे. पंतप्रधान म्हणूनही सुद़ृढ भारताच्या उभारणीचा संकल्प मी सोडलेला आहे. तो पूर्ण होणारच, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
अविकसित जिल्ह्यांतून 157 नवी वैद्यकीय महाविद्यालये
राजस्थानातील या तिन्ही नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना जिल्हा रुग्णालयांशी संबंधित जिल्हास्तरीय नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारकडून प्रायोजित योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. विकासाच्या द़ृष्टीने मागास, सुविधांच्या द़ृष्टीने वंचित जिल्ह्यांना या योजनेत प्राध्यान्य देण्यात आले आहे. योजनेच्या तीन टप्प्यांत संपूर्ण देशात 157 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.