

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाने 2070 पर्यंत 'नेट झिरो'चे लक्ष ठेवले आहे. 'ग्रीन ग्रोथ' आणि 'ग्रीन जॉब्स'वर आता देशाचे लक्ष आहे. याच लक्षप्राप्तीच्या दिशेने प्रत्येक राज्यातील पर्यावरण मंत्रालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करीत राज्यातील पर्यावरण मंत्र्यांनी 'सर्क्युलर इकोनॉमी'ला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. यामुळे घनकचरा व्यवस्थापन तसेच एकदा वापरात येणार्या प्लास्टिक मुक्तीच्या अभियानाला अधिक बळ मिळेल, असे ते म्हणाले.
गुजरातमधील एकता नगरमध्ये आयोजित पर्यावरण मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेला मोदी यांनी आभासी पद्धतीने संबोधित केले. आधुनिक पायाभूत सुविधांशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. पर्यावरणीय मंजुरीच्या नावाखाली देशात पायाभूत सुविधांची निर्मिती कशाप्रकारे रोखली जात होती, हे येथे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर लगेच सरदार सरोवर धरणाचा शिलान्यास करण्यात आला. यात सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती.
पंडित नेहरू यांनी धरणाचा शिलान्यास केला होता. सर्व अर्बन नक्षलवादी त्यानंतर मैदानात आले. ही योजना पर्यावरण विरोधी असल्याचा खोटा प्रचार त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र, या कामाची सुरुवात पंडित नेहरूंनी केली आणि मी पंंतप्रधान झाल्यानंतर हे कार्य पूर्ण झाले," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत गिरमधील सिंह, वाघ, हत्ती, एक शिंग असलेला गेंडा तसेच बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मध्यप्रदेशात चित्त्यांची घरवापसी झाल्याने नवा उत्साह निर्माण झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेल्या राज्यांनासुद्धा आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे आव्हान पर्यावरण विभागाचे देखील आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.