

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीत ( विधान परिषद निवडणूक ) मतदारांची संख्या मर्यादित असली तरी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जुने व्हिडीओ या निवडणुकीच्या निमित्ताने व्हायरल केल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यातील लढत चर्चेचा विषय असते. मग महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या पराभवानंतर वाजवलेली 'शिट्टी'ची आठवण असू दे नाही तर 'आमचं ठरलंय' ही सतेज पाटील यांची गेल्या निवडणुकीतील टॅगलाईन असू दे. कार्यकर्ते नेहमीच आपल्या नेत्याचा उदो उदो करण्यात कुठेच मागे राहात नाहीत. आताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदार ( विधान परिषद निवडणूक ) हे मर्यादित आहेत. त्यांच्यापर्यंत नेते पोहोचले आहेत. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य लोकांनाही कोण किती प्रभावी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राहुल आवाडे यांचे नाव चर्चेत होते. पण भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारी दिली. यासंदर्भात प्रकाश आवाडेंचे भाषण चर्चेत आले. राहुल आवाडे यांचे नाव वगळल्याने महाडिक-आवाडे यांच्यात अंतर्गत वाद आहे का? 270 ची मॅजिक फिगर महाडिक यांना अस्वस्थ करत आहे का, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले आहेत. पुन्हा कमळ विधान परिषदेत, असे सांगत अमल महाडिक यांनी 2014 च्या निवडणुकीची आठवण करून दिली आहे. अवघ्या 20 दिवसांत प्रचार करून कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांचा पराभव केला. त्याची पुनरावृत्ती पुन्हा करणार, असे म्हटले आहे.
सतेज पाटीलही कुठे मागे नाहीत. अमल महाडिक व मला – एका गल्ली सोडा, पब्लिक कोणाला जास्त वळखतंय ते समजेल, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या निवडणुकीत 270 चा जादुई आकडा कसा गाठणार, मुहूर्तमेढ विजयाची हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत आहेत.