

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये अफलातून सामने आणि खेळाडूंचा स्फोटक खेळ पाहायला मिळत आहे. बुधवारीदेखील चित्तथरारक सामन्यात गुजरातने हैदराबादला नमवले. तथापि, सर्वाधिक चर्चा झाली ती पराभूत संघ हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या बहारदार कामगिरीची. त्याने वार्याच्या वेगाने गोलंदाजी करून सर्वांचीच मने जिंकली. गुजरातचा निम्मा संघ गारद करून त्याने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले आहे यात शंका नाही. अर्थात, त्याच्या या लखलखीत यशामागे हैदराबादचे गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन यांचा मोठा वाटा आहे. स्टेन यांनी दिलेला गुरुमंत्र उमरानला भलताच लाभदायी ठरला.
टप्पा आणि दिशा यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जमेल तेवढ्या वेगाने चेंडू टाक, असा सल्ला स्टेन यांनी उमरानला दिला होता. उमरानने तो तंतोतंत पाळला आणि कमाल वेगाने गोलंदाजी करून समोरच्या फलंदाजांना सळो की पळो केले. गुजरातविरुद्धच्या लढतीत उमरानने 4 षटकांत अवघ्या 25 धावा देत पाच बळी घेतले. यामध्ये गुजरातचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर असा तगड्या फलंदाजांचा समावेश होता. कोणत्याही अनकॅप्ड गोलंदाजाने आयपीएलमध्ये केलेले हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होय.
उमरान म्हणजे 'झाकलं माणिक'
न्यूझीलंडचा अव्वल फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी हा तर उमरानच्या प्रेमातच पडला आहे. व्हिटोरीच्या मते अचाट वेगाने गोलंदाजी करणारा उमरान म्हणजे भारतीय क्रिकेटला मिळालेली देणगी आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील गवताळ व वेगवान खेळपट्ट्यांवर तो जगातील अव्वल फलंदाजांनाही दे माय धरणी ठाय करून सोडू शकतो.
सामनावीर किताबही पटकावला
कोणत्याही क्रिकेट सामन्यानंतर जिंकणार्या संघातील खेळाडूला सामनावीर या उपाधीने गौरवले जाते. आयपीएलमध्ये त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' असे म्हटले जाते. मात्र, बुधवारच्या सामन्यात सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली. सामना पराभूत झाल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिक याला प्लेअर ऑफ द मॅच किताब देण्यात आला. त्याचे नाव पुकारण्यात आले तेव्हा सगळ्या स्टेडियमने टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले.
आता या दमदार कामगिरीनंतर क्रिकेट जगतातून उमरानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर तो लवकरच भारतीय संघात जागा मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. केविन पीटरसन यांनीही उमरानला इंग्लंड दौर्यात संधी मिळायला हवी, असे वक्तव्य केले आहे. थोडक्यात काय, तर सामना गुजरातने जिंकला, पण मने जिंकली उमरानने असेच कालच्या लढतीचे वर्णन करावे लागेल.