

वॉशिंग्टन : पुरुषांमध्ये किंवा कोणत्याही सस्तन प्रजातीच्या नरामध्ये 'एक्स-वाय' अशी गुणसूत्रे असतात. स्त्रिया किंवा माद्यांमध्ये 'एक्स-एक्स'अशी गुणसूत्रे असतात. याचा अर्थ पुरुष लिंग ठरवण्यासाठी 'वाय' हे गुणसूत्र आवश्यक असते. भ्रूणामध्ये हे गुणसूत्र पुरुषाकडूनच येते व स्त्रीकडून नेहमी 'एक्स' गुणसूत्रच येत असते. (त्यामुळे मुलगा होणार की मुलगी हे महिलेवर नव्हे, तर सर्वस्वी पुरुषावरच अवलंबून असते.) आता संशोधकांनी म्हटले आहे की, पुरुष लिंग ठरवण्यासाठी जबाबदार असलेले 'वाय' क्रोमोसोम किंवा गुणसूत्र आता हळूहळू कमी होत चालले आहे. त्याच्या जागी नवे जनुक विकसित झाले नाही, तर जगातून पुरुष किंवा नर जाती लुप्त होऊन जाईल व केवळ माद्याच राहतील.
माणूस किंवा अन्य सस्तन प्राण्यांचा विचार केल्यास माद्यांमध्ये दोन 'एक्स' गुणसूत्रे असतात, तर नरांमध्ये एक्स गुणसूत्राबरोबर एक छोटे 'वाय' गुणसूत्र असते. 'एक्स' गुणसूत्रात 900 जनुके असतात. मात्र, या गुणसूत्रामुळे एखाद्या भ्रूणाची लिंगनिश्चिती होऊ शकत नाही. 'वाय' गुणसूत्रात 55 जनुके असतात. हे गुणसूत्र आकाराने लहान असले, तरी त्याचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्यामध्ये एक गरजेचे 'एसआरवाय' जनुक असते. ते गर्भधारणेच्या बाराव्या आठवड्यानंतर भ्रूणामध्ये वृषण विकसित करते. भ्रूणामधील हे वृषण मेल हार्मोन्स म्हणजेच पुरुषी हार्मोन्स उत्सर्जित करतात व त्यामुळे भ्रूण नर म्हणून जन्माला येते. एका संशोधनानुसार आता माणूस किंवा अन्य सस्तन प्राण्यांमधील हे 'वाय' गुणसूत्रे घटत चालले आहे. ऑस्ट्रेलियन प्लॅटिपसच्या अभ्यासावरून हे समजून घेता येऊ शकते. त्यांच्यामध्ये 'एक्स' आणि 'वाय' गुणसूत्रांमधील जनुकांची संख्या एकसारखीच आहे.
एकेकाळी माणसामध्येही 'एक्स' आणि 'वाय' गुणसूत्रातील जनुकांची संख्याही समान होती. याचा अर्थ 'वाय' गुणसूत्रातही 55 ऐवजी 900 जनुके होती. त्यावरून अनुमान लावले जाऊ शकते की, 16.6 कोटी वर्षांपूर्वीपासून आतापर्यंत माणसाने 'वाय' गुणसूत्रातील 845 जनुके गमावली आहेत. त्याचा अर्थ आपण प्रत्येक दहा लाख वर्षांमध्ये पाच जनुके गमावत आहोत. असेच सुरू राहिले, तर पुढील 1.1 कोटी वर्षांमध्ये 'वाय' गुणसूत्र पूर्णपणे नष्ट होऊन जाईल.
संशोधकांनी म्हटले आहे की, रोडंटस् म्हणजेच उंदरांसारख्या वस्तू कुरतडणार्या प्राण्यांच्या दोन प्रजातींमधील 'वाय' गुणसूत्र नष्ट झाले होते व तरीही ते लुप्त झाले नाहीत. पूर्व युरोपच्या मोल वोल्स आणि जपानच्या स्पायनी उंदरांमध्ये असे घडले आहे. त्यांच्यामध्ये केवळ 'एक्स' गुणसूत्रच आढळली आहेत. त्यामध्ये 'एसआरवाय' जनुक आढळलेले नाही.
वैज्ञानिकांना आढळले की, स्पायनी उंदरांमध्ये 'एसओएक्स 9' नावाचे एक सेक्स जीन (लिंग निर्धारण करणारे जनुक) असते. नर उंदरांमध्ये या जनुकाजवळ डुप्लिकेट 'डीएनए' असते. त्याच्या माध्यमातून 'एसओएक्स 9' जनुक हे 'एसआरवाय'सारखे कार्य करू लागते. हीच 'डीएनए' क्रिया नर आणि मादी उंदरांना वेगवेगळे करते. भविष्यात कदाचित माणसामध्येही अन्य जनुक 'एसआरवाय'चे गुण विकसित करून नवे सेक्स जीन बनू शकेल.