लवंगी मिरची : नाही आनंदाला तोटा!

लवंगी मिरची : नाही आनंदाला तोटा!
Published on
Updated on

आजोबा, ही घ्या आपट्याची पानं.
अरे, हे काय आपट्याचं निम्मं झाडच ओरबाडून आणलंस की काय?
बघा. कालपासून आपट्याची पानं आण, आण, असा जप तुम्हीच करत होतात ना?
बरोबर आहे; पण पानं आणि फांद्या ह्यात थोडा फरक असतो ना सोन्या? एवढ्या फांद्या पहिल्यांदा यायला, पुढे त्या एवढ्या भरघोस वाढायला, किती वेळ गेला असेल, काही कल्पना आहे?
गावाबाहेर, माळरानावर जाऊन हा भारा आणण्यात आम्हा मित्रांचाही खूप वेळ गेलाय बरं का? आम्ही सगळे आपलेआपले ग्रुप करून गेलेलो. उगाच बाहेरच्यांना नव्हतं घेतलं त्यात.
आपलेआपले ग्रुप म्हणजे?
आम्ही एक जातवाले. वेगळ्या धर्माच्या लोकांचा तर प्रश्नच नाही येत; पण सणावारी जात, पंथही जपतो बरं का.
तू मित्रांबरोबर जाऊन एवढं केलंस, चांगलंय पोरा. पण जरा अर्थबिर्थ नीट समजून घ्यायचास ना! पूजेला चार पानंही पुरली असती रे.
मागच्या वर्षी आम्ही मित्रांनी रावणाची प्रतिमा बनवून पटांगणात जाळायची ठरवली, तेव्हाही तुम्हीच आडवे आलात.
भर वस्तीत आलंय आता आपल्याकडचं पटांगण.तुम्ही धांदरट पोरं. उगाच रावणाला पेटवण्याच्या नादात भलतीकडे काही जाळपोळ झाली असती
तर?
थोडक्यात म्हणजे आम्ही काही केलं की तुमचा विरोध ठरलेलाच, नाही का? आता आम्ही काय पांडवांसारखी शमीच्या झाडावर टांगलेली शस्त्रं घेऊन अज्ञातवासातून परत येणारोत? का हिरीरीने महिषासुराला मारणारोत? का सीमोल्लंघन की काय ते करणार आहोत?
बाकी गोष्टी एकवेळ सोडा मिस्टर; पण सीमोल्लंघनाची आजही गरज आहे बरं का तुम्हाला.
बस्का? आता सीमा कुठल्या ओलांडायला सांगताय आणखी?
मगाशी ते आम्ही, आपलेआपले, आमचा ग्रुप वगैरे काय चाललं होतं रे तुझं?
कॉलेजमधलं सांगत होतो. एरवी ट्रीपला जाताना, कट्ट्यावरच्या गप्पा छाटताना आम्ही सगळे एकत्र असतोच; पण घरगुती गोष्टीत, सणावाराच्या तयारीत आम्ही आपापल्या जाती-धर्मांच्या घोळक्यातच राहात असतो.
का? ते 'दुसरे', 'परके' तुम्हाला काय खातात का गिळतात?
तसंच नाही अगदी; पण शेवटी ते प्रत्येकाचं वेगळं पडतं ना!
वेगळं असेल; पण दुसर्‍याचं ते सगळं वाईट असं असतं का?
काय माहिती!
बघ, म्हणजे धड माहीत नसतानाच तुम्ही असल्या जाती-धर्माच्या सीमा पाळताय. असले कसले रे तुम्ही तरुण लोक?
आली तुमची गाडी पुन्हा आमच्यावर?
माझं सोडा. तुम्हीच विचार करा, ह्या जात,धर्म,पंथाच्या सीमा ओलांडण्यात तुमचा किती फायदा होणार आहे? कधीतरी हे सीमोल्लंघन करण्याचा विचार करा पोरांनो, मग 'दसराच काय, कोणत्याही दिवशी नाही आनंदाला तोटा' असा अनुभव येईल तुम्हाला!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news