लखीमपूर हिंसाचार प्रकरण : आज राज्यात बंदची हाक!

लखीमपूर हिंसाचार प्रकरण : आज राज्यात बंदची हाक!
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई-पुण्यातील व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. काळ्या फिती लावून दुकाने सुरूच राहतील, अशी भूमिका मुंबई व्यापारी संघामार्फत वीरेन शाह यांनी मांडली आहे.

लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये, आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, हा बंद महाराष्ट्र सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर आहे. नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, तसेच व्यापार्‍यांनी आस्थापना, दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महाराष्ट्र बंदची घोषणा चार दिवसांपूर्वी केली होती. चौघा शेतकर्‍यांसह आठ जण या हिंसाचारात मृत्युमुखी पडले होते.

दुकाने उघडी ठेवा, आम्ही संरक्षण करू : भाजप

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपने जाहीर विरोध केला आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून अनेकांची रोजीरोटी हिरावली होती. आता पुन्हा तसाच प्रकार केला जात आहे, असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

आघाडीने पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून मुंबईसह राज्यातील व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला तर भाजप विरोध करेल. दुकानदार, व्यापार्‍यांनी आघाडीच्या आवाहनाला भीक घालू नये. जर कोणी दंडेलशाही करून दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर भाजप रस्त्यावर उतरून दुकानदार, व्यापार्‍यांना संरक्षण देईल, अशी हमी त्यांनी दिली.

महाराष्ट्र बंदला संयुक्त किसान मोर्चाचा पाठिंबा

दरम्यान, लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी सोमवारी (ता. 11) बंदची हाक दिली आहे. या बंदला संयुक्त किसान मोर्चासह लोकसंघर्ष मोर्चाने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच या बंदमध्ये राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

बंदमध्ये खेचू नका : दुकानदारांचे आवाहन

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदनंतरही मुंबई, ठाणे व पुण्यातील व्यापारी, दुकानदारांनी दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा शेतकर्‍यांना पाठिंबा आहे. मात्र या बंदमध्ये आम्हाला खेचू नका, असे आवाहन राज्यातील व्यापार्‍यांनी केले आहे. सध्या दुकानाचे भाडे आणि नोकरांचा पगार देणेसुद्धा अवघड झाले आहे.

मागील वर्षभरात व्यापारी, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आम्ही आवाहन करतो की, या बंदमध्ये आम्हाला खेचू नका, आमचे नुकसान होईल अशी भूमिका घेऊ नका, अशी भूमिका वीरेन शाह यांनी मुंबई व्यापार संघामार्फत मांडली. राज्याच्या अन्य शहरांतील व्यापार्‍यांचीही हीच भूमिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news