

लंडन : जगात काही काही नोकर्या अशा आहेत ज्यांना खरोखरच 'ड्रीम जॉब' म्हणता येईल. एखाद्या पदार्थाची किंवा पेयाची चव घेण्याची, अनेक तास झोपून राहण्याची किंवा खेळ खेळण्याचीही नोकरी असू शकते याची अनेकांना माहिती नसते. ही 'कामे' करून बक्कळ पगारही मिळत असतो. आता इंग्लंडच्या नॉटिंघमशायरमधील एक माणूस अशीच एक नोकरी करीत असून ती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या माणसाला केवळ घरी बसून कार्टून पाहायचे आहे!
26 वर्षांच्या या तरुणाचे नाव आहे अलेक्झांडर टाउनले. त्याचा आवडता कार्टून शो 'द सिम्पसन्स' हा आहे. तो तासन्तास हा कार्यक्रम पाहत राहतो. आता तर त्याला हा आवडता कार्टून शो पाहण्यासाठी दरवर्षी 5 हजार पौंड म्हणजेच पाच लाखांहून अधिक रुपये मिळतात. ही नोकरी रोजची नसून त्या काहीच दिवस हे 'काम' करावे लागते. त्याने आरामात कार्टून शो पाहावा यासाठी त्यााल डोनटचे पॅकेटही पाठवले जातात.
हे डोनटस् खात तो आपले काम पूर्ण करतो. त्याच्या भावाने त्याला या नोकरीविषयी सांगितले होते व त्यावेळी तो तत्काळ यासाठी तयार झाला होता. त्याला सीरिजचे सर्व एपिसोड अगदी लक्ष देऊन पाहावे लागतात आणि त्याचे विश्लेषण करावे लागते. त्यासाठी तो आपल्या हातात वही आणि पेन घेऊन बसतो. एपिसोडच्या क्रेडिटपासून एडिटिंगपर्यंत सर्व गोष्टी तो तपासून पाहतो. विशेष म्हणजे तो एका कॅफेमध्ये सुपरवायझरचीही नोकरी करतो.