

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या वन-डे व टी-20 नंतर आता कसोटी संघाच्या कर्णधारपदी हिटमॅन रोहित शर्मा याची निवड जवळ जवळ निश्चित झाली आहे. कसोटी कर्णधार म्हणून रोहितच्या नावावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तेव्हाच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले की, रोहित शर्मा हा कसोटी कर्णधारपदी असावा, असे निवड समिती आणि प्रशिक्षकांची इच्छा आहे. मात्र, यासंबंधीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचीही घोषणा केली जाईल.
नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अद्याप बीसीसीआयने कर्णधारपदी कोणत्याच खेळाडूची घोषणा केलेली नाही. दरम्यान, बीसीसीआयने भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार्या टी-20 आणि कसोटी मालिकेच्या कार्यक्रमाची नुकतीच घोषणा केली आहे. श्रीलंकेच्या भारत दौर्याची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून होणार आहे. तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेस 4 मार्चपासून मोहालीत सुरुवात होणार आहे.
माजी कर्णधार विराट कोहली आपल्या कारकिर्दीतील 100 वी कसोटी मोहालीत खेळणार आहे. या सामन्यात विराट हा रोहितच्या कर्णधारपदाखाली खेळणार आहे. तर टी-20 मालिकेस 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिली टी-20 लखनौत आयोजित करण्यात आली आहे.