

ज्या ठिकाणी मानवी जिवाला धोका आहे किंवा जी कामे अतिशय क्लिष्ट आहेत, अशा कामांमध्ये सध्या रोबोट (यंत्रमानव) यांचा वापर केला जातो. परंतु, येत्या काळात वैद्यकीय, लष्करी, कृषी, हॉटेल, मार्केटिंग आदी क्षेत्रात यंत्रमानवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे रोबोटिक्स क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज भासणार असून, त्यासाठीचे आवश्यक ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे, असे मत रोबोटिक्स क्षेत्रात काम करणार्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पारंपरिकरीत्या अभियांत्रिकी उत्पादन क्षेत्रात वापरात असलेल्या रोबोटचा उपयोग आता रोजच्या जीवनातील कामांमध्ये होत आहे. यात प्रामुख्याने आता वैद्यकीय क्षेत्रात फक्त शस्त्रक्रियेपुरता मर्यादित विचार न करता, दवाखान्यातील दैनंदिन कामे करतानाही यंत्रमानव मदत करू शकतो. कोरोना संकटात दोन गोष्टींची प्रामुख्याने जाणीव झाली ती म्हणजे डॉक्टर्स व परिचारिकांची वानवा आणि रुग्णांच्या सरळ संपर्कात आल्यामुळे सुरुवातीला आपण गमावलेले वैद्यकीय तज्ज्ञ. जर आपल्याकडे दवाखान्यांमध्ये यंत्रमानव असते, तर या दोन्ही गोष्टींचा सामना करता आला असता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंत्रमानव उपलब्ध असेल, तर तज्ज्ञ डॉक्टर्स दूर अंतरावरूनही त्याद्वारे शस्त्रक्रिया करू शकतील, ज्यातून त्यांच्या कौशल्याचा वापर करता येईल आणि ग्रामीण भागात रुग्णसेवा सुकर होईल.
माणसासारखी दिसणारी मशिन असा रोबोटचा असलेला चेहरा आता बदलत चालला असून, प्रामुख्याने विनावाहक हवाई वाहन ज्याला आता ड्रोन असे संबोधतात, याचा प्रकर्षाने वापर होत आहे. हेरगिरी, टेहळणी आणि हल्ला, आक्रमण यापासून सुरू झालेला ड्रोनचा प्रवास, संरक्षण क्षेत्रात भूसुरुंगाचा शोध लावण्यासाठी प्रभावीपणे केला जात आहे. त्याचबरोबर पिकांची पाहणी व त्यावरील रोगांची माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन उपयोगात आणले जात आहेत. संकटांमध्ये शोध व बचावकार्य, विजेच्या तारांची पाहणी, अनधिकृत बांधकामांचे नियंत्रण, जमिनींचे सर्वेक्षण, भूस्खलन मोजणी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाच्या मार्गाची टेहळणी या नवीन क्षेत्रांत रोबोटिक्सचा वापर वाढत आहे.
जंगलातील प्राण्यांची गणना, जंगलातील आगीची पाहणी आणि शोध, शिकार्यांचा शोध या कार्यात आता ड्रोन्स वापरले जात आहेत. अतिदुर्गम भागात औषधी व छोटी वैद्यकीय उपकरणे पाठवण्यासाठीचा प्रयोगही डीएचएल या जगप्रसिद्ध मालवाहतूकदाराने केला आहे आणि तो यशस्वी ठरला आहे. यंत्रमानवांमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव, आभासी वास्तव आणि मिश्रित वास्तव, याचा वापर सुरू झाला आहे, जेणेकरून रोबोट मानवाप्रमाणेच निर्णय घेऊ शकणार आहेत. त्यामुळे येत्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रांत यंत्रमानव दिसणार असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्या कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे.
रोबोटिक्स म्हणजे काय?
रोबोटिक्समध्ये तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि यंत्रमानव संबंधित अनुप्रयोगांचा समावेश आहे. रोबोट असे एक मशिन आहे जे संगणकाच्या नियंत्रणाखाली विविध कार्ये करते, ज्यासाठी रोबोट मशिनची रचना केली गेली आहे.
रोबोटिक्ससाठी हवे संगणक अभियांत्रिकीचे ज्ञान
इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन किंवा ड्रोन तंत्रज्ञानात तज्ज्ञ असल्यास देश आणि जगाच्या रोबोट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसह उद्योग आणि व्यवसायात येत्या काही वर्षांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. सध्या भारतात रोबोट डिझाइनसाठी, विकसनशील व प्रोग्रामिंगसाठी पात्र, अनुभवी व्यावसायिकांची बरीच मागणी आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात आता अभियांत्रिकीची पदवी आणि पदव्युत्तर पदवी उपलब्ध आहे. काही संस्थांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम व पदवी असा एकात्मिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे. रोबोटिक्ससाठी प्रामुख्याने यंत्र अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकीचे ज्ञान आवश्यक असते.
रोबोटिक्सशी संबंधित विविध शैक्षणिक अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे
औद्योगिक क्षेत्रातील इंडस्ट्री 4.0 आणि संरक्षण क्षेत्रात लोकल फॉर व्होकलचा विचार केला, तर येत्या काळात रोबोटिक्स तंत्रज्ञानाला प्रचंड मागणी राहणार आहे.संरक्षण क्षेत्रात उंच अतिदुर्गम रस्त्यांवर जिथे सैनिकांना योग्य वेळेत रसद पोहचविणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी सध्या यंत्रमानवांचा वापर करण्यावर संशोधन सुरू आहे. तसेच, यंत्रमानवाला दृष्टी देऊन वेगवेगळ्या गोष्टी ओळखायला लावणे, लष्कराच्या विविध कार्यांसाठी ड्रोनवर संशोधन करण्यात येत आहे. येत्या काळात रोबोटिक्स क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचे महत्त्व वाढणार आहे.
– डॉ. दिनेश ठाकूर, संचालक, स्कूल ऑफ रोबोटिक्स, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नोलॉजी