

वॉशिंग्टन : गेल्यावर्षी एका रोबो डॉग चा व्हिडीओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला होता. अनेक लोकांना तो आवडला होता आणि त्याच्याबाबत अधिक जाणून घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
सार्वजनिक ठिकाणी 'बोस्टन डायनॅमिक्स'च्या या रोबो डॉगला फिरत असताना पाहून अनेक लोक चकीत झाले होते. आता लवकरच हा यांत्रिक कुत्रा शस्त्रयुक्तही होणार आहे. हे अनोखे शस्त्र शत्रूंचा कर्दनकाळ बनू शकते.
'स्पॉट' नावाच्या या रोबो श्वानाला सिंगापूरच्या एका पार्कमध्येही पाहण्यात आले आहे. तिथे त्याने 'गार्ड डॉग'ची भूमिका पार पाडली होती. कोरोना काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देण्याचे काम त्याने केले होते. आता हा रोबो डॉग 'स्वोर्ड इंटरनॅशनल' आणि 'घोस्ट रोबोटिक्स'च्या नव्या संरचनेसह किंवा नव्या हत्यारासह समोर आला आहे. हा रोबो डॉग आपल्या पिवळ्या कव्हरमध्ये असतो आणि तो अजिबात 'खतरनाक' वाटत नाही.
मात्र, 'स्वोर्ड इंटरनॅशनल'च्या 'स्पेशल पर्पस अनमॅन्ड रायफल' (स्पर) क्वाड्रूपेडल अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल्सवर बसवताच तो एक घातक शस्त्र बनतो. अलीकडेच या हायटेक हत्याराचे एका एक्स्पोमध्ये अनावरण करण्यात आले. या रायफलला घोस्ट रोबोटिक्स 'क्युयुजीव्ही'वर पाहण्यात आले.
सोशल मीडियात अनेक लोक या हायटेक हत्याराने प्रभावित झाले आणि काही लोकांनी त्याच्या वापराबाबत चिंताही व्यक्त केली. अनेक लोकांनी रोबोवर लावलेल्या बंदुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.