रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होण्यासाठी तोडगा काढू : ना. राणे
राजापूर; पुढारी वृत्तसेवा : कोकणवासीयांना रोजगाराच्या दृष्टीने रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लागावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून त्या पार्श्वभूमीवर रिफायनरी समर्थक संघटनेच्या वतीने कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेण्यात आली.
दिल्लीतील उद्योग भवनमधील कार्यालयात ही भेट झाली. या वेळी रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा, यासाठी सामंजस्याने तोडगा काढू व यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. नारायण राणे यांनी त्या प्रसंगी दिले.
या भेटीदरम्यान स्थानिकांना रोजगार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास, शैक्षणिक व आरोग्य सुविधा यासाठी हा प्रकल्प राजापुरातच व्हावा या बाबतचे कागदोपत्री विस्तृत सादरीकरण ना. राणे यांना केले.
सुमारे एक तास झालेल्या चर्चे मध्ये मागील चार वर्षातील विविध समर्थक संघटनांद्वारे केलेली आंदोलने, मोर्चे, स्थानिक शेतकरी यांनी दिलेली सुमारे 8500 एकर जमिनीची प्रकल्पा साठी दिलेली संमतीपत्रे, विविध गावांनी व संघटनांनी रिफायनरी सामर्थनाचे केलेले ठराव या बाबतची विस्तृत माहिती देण्यात आली.
पूर्वीची जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द झाल्यानंतर विरोधाचे सीमेलगतचे भाग, वाड्या व गावे वगळून स्थानिक जमीन मालकांनी दिलेल्या संमातीच्या आधारे सुधारित केलेल्या जमिनीच्या नाकाशाबाबतही त्यांना माहिती देण्यात आली.
रिफायनरी प्रकल्पामुळे निर्माण होणार्या असंख्य पूरक उद्योगासाठी लगतच्या चखऊउ प्रकल्पासाठी अधिसूचित बारसु सोलगाव येथील प्रकल्पालाही चालना द्यावी. जेणेकरून रिफायनरी प्रकल्पाशी निगडीत उद्योगधंद्यांमुळे येणारी विकासाची साखळी निर्माण होईल, अशी मागणीही त्यांना करण्यात आली.
या शिष्टमंडळामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, सचिव अविनाश महाजन,सल्लागार सीए. नीलेश पाटणकर तसेच मिलिंद दांडेक यांचा सहभाग होता.

