राहुल युगाचा उदय

राहुल युगाचा उदय
Published on
Updated on

भारतीय क्रिकेटचे कर्णधारपद असो वा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना द वॉल असे बिरुद घेऊन भारतीय संघाचे रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील. रवी शास्त्रींनी संघाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यावर कळस बांधण्याची अवघड कामगिरी द्रविडला करावयाची आहे.

भारताच्या टी-ट्वेन्टी विश्वचषक मोहिमेची वाटचाल पात्रता फेरीतच संपली आणि त्याच बरोबर रवी शास्त्री युगाचा अस्त झाला. विराट कोहलीने टी-ट्वेन्टी संघाचे कर्णधारपद सोडले तर रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची सांगता झाली. रवी शास्त्री यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची नियुक्ती झाली. कुठच्याही व्यक्तीचे नाव आणि बाह्यजगात तिची असलेली प्रतिमा यांचा काही संबंध असतोच असे नाही. पण रवी ते राहुल हा बदल तंतोतंत त्यांच्या नावाप्रमाणेच असेल. रवी शास्त्री यांची प्रतिमा प्रखर सूर्यासारखी आहे तर गौतम बुद्धासारख्यालाही आपल्या मुलाला पहिल्यांदा पाहिल्यावर राहुल म्हणावेसे वाटले. राहुल म्हणजे कार्यक्षम किंवा सक्षम हेही राहुलच्या द्रविडच्या गुणांशी साधर्म्य साधते.

भारतीय संघ कोहली – शास्त्री या जोडीच्या मुशीतून गेली चार वर्षे घडला. या संघाने भले आयसीसी स्पर्धा जिंकली नसेल; पण त्यांनी यशाची अनेक शिखरे गाठली. ही शिखरे गाठायला संघाला गुणवत्तेपेक्षा मनोवृत्तीतील बदल जास्त उपयोगी ठरला आणि हे घडवून आणण्यात रवी शास्त्री यांचा मोठा वाटा आहे. रवी शास्त्री आणि राहुल द्रविड हे दोघे सर्वस्वी भिन्न प्रवृत्तीचे, अनुभवाचे असल्याने रवी शास्त्री यांनी नेऊन ठेवलेल्या उंचीवरून राहुल द्रविड पुढची वाटचाल कशी करतो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

रवी शास्त्री यांची आपण अकराव्या क्रमांकापासून ते सलामीच्या फलंदाजपर्यंतची वाटचाल, लढवैय्या अष्टपैलू ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या बहुमानापर्यंत वाटचाल बघितली तर मर्यादित गुणवत्ता असूनही रवी शास्त्री यांनी मनोवृत्तीच्या जोरावर हे सर्व साध्य केले आणि एक प्रदीर्घ कारकीर्द ते खेळू शकले आणि हाच बाणा त्यांनी एक प्रशिक्षक म्हणून काम करताना सरासरी गुणवत्ता असलेल्या खेळाडूंकडून अजोड कामगिरी करून घेण्यासाठी वापरला. क्रिकेटनंतर समालोचक म्हणून कार्यरत असताना रवी शास्त्री यांना बीसीसीआयने वेळोवेळी तारणहार म्हणून बोलावले होते. 2007 च्या वेस्ट इंडिजमधील विश्वचषकातल्या मानहानीकारक पराभवानंतर ग्रेग चॅपल यांना पायउतार व्हायला लागल्यावर पुढच्या बांगलादेश दौर्‍याला शास्त्री यांची क्रिकेट मॅनेजर म्हणून नेमणूक झाली.

परदेशी प्रशिक्षक का भारतीय प्रशिक्षक हा एकेकाळी मतांतराचा विषय होता. 2014 साली इंग्लंडच्या दौर्‍यातील लाजिरवाण्या पराभवानंतर शेवटचा परदेशी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची उचलबांगडी होणार हे नक्की झाले. फ्लेचरना प्रशिक्षक पदावर ठेवून रवी शास्त्री यांची क्रिकेट डायरेक्टर पदावर नियुक्ती झाली ती पुढे होणार्‍या मुख्य प्रशिक्षक पदासाठीच हे नक्की होते. थोडा वेळ बांगर, मग कुंबळे हे प्रयोग झाल्यावर पुन्हा रवी शास्त्री प्रशिक्षक झाले आणि त्यांची कुंडली कोहलीशी जमली. भारतीय संघाच्या पुनर्बांधणीचा तो काळ होता.

गुणवत्ता ठासून भरलेले खेळाडू रातोरात मिळणार नव्हते. तेव्हा रवी शास्त्रींची एक खेळाडू म्हणून जशी कारकीर्द घडवली ते ज्ञान उपयोगात आणून अनेक नवोदित अननुभवी खेळाडूंच्या आधाराने त्यांनी संघ बांधला. त्या संघात कुठच्याही तगड्या संघाविरुद्ध लढायचा आत्मविश्वास भरला. रवी शास्त्रींनी प्रशिक्षक म्हणून थेट भारताच्या संघाबरोबर काम केले म्हणजेच क्रिकेटचे संस्कार घोटवून

भारतीय संघाचे दार ठोठावून आलेल्या खेळाडूंबरोबर काम केले.
याउलट राहुल द्रविड निवृत्तीनंतर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात मनापासून रमला. ना त्याने समालोचक होण्याचा धोपट मार्ग स्वीकारला, ना तो कधी भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत उतरला. आत्ताही हे प्रशिक्षकपद त्याच्या गळी उतरवले आहे.नाही तर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून रमला होता.

कोवळ्या युवा क्रिकेटपटूंना संस्काराचे धडे देऊन क्रिकेटच्या महाविश्वात जायला तयार करण्यात त्याला मनापासून आवडत होते. पण आता त्याला थेट भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक केल्याने अनेक महारथींना आणि येणार्‍या नव्या खेळाडूंना तो कसे हाताळतो हे बघावे लागेल. युवा खेळाडूंचा एकोणीस वर्षाखालील अथवा अ संघ हाताळणे हे सर्वस्वी वेगळे असते.

भारताच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंवर कामगिरीचे जे दडपण असते, ते युवा खेळाडूंच्या मानाने कित्येक पट जास्त असते. रवी शास्त्रींकडे या खेळाडूंची मानसिकता जोखून त्यांच्याकडून कामगिरी करून घेण्याचे कसब होते. राहुल द्रविडला आजपर्यंत तरी असा अनुभव नाही. याचा अर्थ राहुल द्रविडला हे जमणार नाही किंवा कठीण जाईल असा नाही. राहुल द्रविड हा अतिशय अभ्यासू वृत्तीचा असल्याने पहिले पाच-सहा महिने तो खेळाडूंचे फक्त निरीक्षण करून त्याच्या पद्धतीने नोंदी करेल आणि मग तो खेळाडूंच्या जास्त जवळ जाईल.

जेव्हा तुम्ही भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असता तेव्हा अपेक्षा असते ती खेळाडूंशी उत्तम सुसंवाद साधत त्यांच्याकडून कामगिरी करून घेण्याची. कारण या पातळीवर खेळाडूंना काही बेसिक प्रशिक्षणाची गरज नसते. काही विशिष्ट उणिवांवरच पर्याय शोधायचा असतो. रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक झाले तेव्हा गोलंदाजी प्रशिक्षक भारती अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून श्रीधर ही टीम वेळप्रसंगी टीका सहन करून मागून घेतली. आज शास्त्रींच्या या सहायक फळीच्या निवडीची फळे आपण चाखत आहोत, विशेषतः गोलंदाजी विभागात.

एकेकाळी जलदगती गोलंदाजीत वानवा असलेला भारतीय संघ आज जगातील उत्तम गोलंदाजांचा ताफा बाळगून आहे. नुसता बाळगूनच आहे असं नाही तर 2017 म्हणजेच शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाच्या सुरुवातीपासून आजतागायत भारतीय गोलंदाजांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी मिळवले आहेत. आकडेवारीच सांगायची झाली तर आपण 1717 बळी हे 27.47 च्या सरासरीने आणि 38.5 च्या स्ट्राईक रेटने मिळवले आहेत. यापैकी 1011 बळी हे जलदगती गोलंदाजांचे आहेत.

भारतीय संघाचे जलदगती गोलंदाज हे परदेशात बळी मिळवण्यात अपयशी ठरत होते. 2010 पासून अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीपर्यंतच्या सात वर्षांत भारतीय जलदगती गोलंदाजांनी 461 डावांत 33.99 च्या सरासरीने आणि 47.5 च्या स्ट्राईक रेटने 674 बळी मिळवले होते. रवी शास्त्रींच्या कारकिर्दीतल्या या चार वर्षांत भारतीय जलदगती गोलंदाजांनी परदेशात 377 सामन्यांत 27.81 च्या सरासरीने आणि 41.3 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 571 बळी मिळवले आहेत. एक मुख्य प्रशिक्षक या नात्याने एका अर्थाने त्यांनी भारती अरुणवर दाखलेल्या विश्वासाची ही पावतीच ठरते.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत राहुल द्रविडच्या बरोबर गोलंदाज प्रशिक्षक असलेल्या पारस म्हांब्रेने गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. सर्वसाधारणपणे मुख्य प्रशिक्षक आपली टीम बांधतो या अलिखित न्यायाने पारस म्हांब्रेला राहुल द्रविड गोलंदाज प्रशिक्षक म्हणून आणेल हे जवळपास नक्की आहे. शास्त्री-अरुण जोडीने केलेले उत्तम काम द्रविड – म्हांब्रे जोडी कसे पुढे नेते यावरही द्रविडच्या यशाचे मोजमाप होईल.

विशेषतः इशांत शर्मा, शामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव हे येत्या काही वर्षांत निवृत्त होत असताना म्हांब्रेच्या हाताखाली तयार झालेले एकोणीस वर्षाखालील संघातले गोलंदाज ही रिक्त होणारी पदे भरून काढायला कसे तयार होतील यावर यशापयशाचे आकडे बदलतील. कारण विजय मिळवायला प्रतिस्पर्ध्याचे वीस गडी बाद करू शकणारे गोलंदाज आपल्या भात्यात असावे लागतात. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर जाऊन नवा प्रशिक्षक येईल. थोडक्यात, एक फलंदाजी प्रशिक्षक सोडला तर सर्व संच नवा असेल. राहुल द्रविडसाठी जरी हा नवा संच नवा नसला तरी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करणे आणि भारतीय संघासाठी काम करणे नवे असेल.

आज भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू हा दडपणाच्या ओझ्याखाली आहे. हे दडपण कामगिरीचे आहे. बायो बबलमध्ये दीर्घ काळ राहण्याचे आहे. काही मोजके खेळाडू सोडले तर कुणालाच संघात आपली जागा पक्की वाटत नसेल. आपल्या जागी दुसर्‍याला संधी दिली आणि तो चमकदार कामगिरी करून गेला तर आपल्याला परतायला किती वेळ लागेल ही चिंता सर्वांच्या मनात असेल. आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकात मुख्य खेळाडूंची दमछाक होते. पण बीसीसीआयच्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विनंतीशिवाय संघमालकांवर जास्त अंकुश नसतो. या सर्व परिस्थितीत राहुल द्रविडला रोटेशन पॉलिसी राबवावी लागेल. हे करताना ज्या खेळाडूंना पाळीपाळीने विश्रांती दिली जाईल. त्यांना त्यांच्या संघातील स्थानाबद्दल शाश्वतीचा विश्वास द्रविडला द्यावा लागेल.

रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांच्यात क्रिकेट व्यतिरिक्त अजून एक तुलना करायची झाली तर शास्त्रींचा संघाला धाक वाटेल असे व्यक्तिमत्व होते. कोहली-शास्त्री जोडीचा शिस्तीपेक्षा धाक जास्त होता. राहुल द्रविडचा स्वभाव मवाळ असल्याने त्याची संघावर पकड त्याला बसवावी लागेल. कधी कधी एक क्रिकेटर किंवा प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना आदर असला तरी विशेषतः युवा खेळाडूंना क्रिकेटबाह्य शिस्त बाळगायला प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते.

भारतीय क्रिकेटचे कर्णधारपद असो वा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना द वॉल असे बिरुद घेऊन भारतीय संघाचे रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. पण भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील. रवी शास्त्रींनी संघाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, राहुल द्रविड त्यावर कळस बांधायची अवघड कामगिरी कशी करतो हे पुढच्या काही महिन्यांत दिसून येईल. रवीच्या अस्तानंतर झालेल्या राहुलच्या उदयाकडे सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी जनता अनेक अपेक्षा घेऊन बघत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news