

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 7 खेळाडूंनी पदके जिंकली असून, त्यांना महाराष्ट्र सरकारने मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
राज्यातील या पदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने आधी जाहीर केलेल्या रकमेत मोठी वाढ केली आहे. सुवर्णपदक जिंकणार्या खेळाडूंना प्रथम 12 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आता त्यात वाढ करून थेट 50 लाख एवढे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर 'रौप्य' आणि कांस्यपदक विजेत्यांची बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली.
प्रशिक्षकांच्या बक्षिसातही केली वाढ
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 14 खेळाडू सहभागी झाले होते. यातील 7 खेळाडूंना पदक जिंकण्यात यश आले. पदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने 12 लाख 50 हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. या बक्षिसात महाराष्ट्र सरकारने विक्रमी वाढ केली असून, सुवर्णपदक विजेत्याला 50 लाख तसेच रौप्यपदक विजेत्यांना 30 लाख देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय कांस्यपदक विजेत्यांना आता 20 लाख रुपये दिले जाणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे, खेळाडूंच्या प्रशिक्षकांनादेखील तीन लाखांच्या जागी 12 लाख रुपये देण्यात येणार आहेत.