राणेंना अटक ते सुटका : महाड न्यायालयात नेमकं काय घडलं?

राणेंना अटक ते सुटका : महाड न्यायालयात नेमकं काय घडलं?
Published on
Updated on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या अनूशंगाने दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर येथे अटक करुन महाड न्यालयात हजर केले. प्रथम वर्ग ऩ्यायदंडाधिकारी शेखभाऊसो पाटील यांच्या समोर या प्रकरणी सूनावणी झाली. उभय पक्षाची बाजू ऐकून घेवून न्यायालयाने राणे यांना जामिन मंजूर केला आहे.

राणे यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशीरा आणण्यात आले. प्रथम येथूनच व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे महाडचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेखभाऊसो पाटील यांच्यासमोर हजर केले जाणार होते. मात्र न्यायालयाने न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश दिल्याने राणे यांना महाड रात्री 10.10 वाजता न्यायालयासमोर आणण्यात आले व सुनावणीस प्रारंभ झाला.न्यायालयात नारायण राणे यांची बाजू मुंबईतील वकील अ‍ॅड.राजेंद्र शिरोडकर यांनी मांडली त्यांना अ‍ॅड.अंकित बंगेरा, अ‍ॅड. महेश मोहिते, अ‍ॅड.आदित्य भाटे, अ‍ॅड. निलेश रातवडकर यांनी सहाय्य केले तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.भूषण साळवी यांनी यूक्तीवाद केला.

सरकार पक्षाने राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानामागे काही कट आहे का याचा तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे होते. त्यास राणे यांच्या वकिलांनी विरोध केला. राणे यांनी असे विधान करण्यामागे कोणताही कट नाही. जाहीर पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे, असे या वकिलांनी सांगितले. मात्र राणेंच्या वादग्रस्त विधानावर फार भर न देता राणे यांचे वय, पद आणि तब्येत ही तीन कारणेही त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडली. शेवटी न्यायालयाने राणे यांना न्यायालयीन कोठडी देत जामिनाचा मार्ग मोकळा झाला आणि रात्री साडेअकराच्या सुमारास राणे जामिनावर सुटले.

नारायण राणेंविरुद्ध महाड (रायगड) सह नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी रायगड सह नाशिक आणि पुणे पोलिसांची पथके रत्नागिरीमध्ये पाठविण्यात आली होती. राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सूनावणी तातडीने घेण्यास हायकोर्टानेही नकार दिल्याने राणे यांना अटक होणार हे स्पष्ट झाले होते. याच दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी राणे यांची भेट घेऊन वस्तूस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर राणे यांना संगमेश्‍वर येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली व रात्री महाड न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

राणे यांना सशर्त जामीन

1. रायगडच्या गुन्हेशाखेमध्ये दोन दिवस हजेरी लावणे बंधनकारक.

2. पहिली हजेरी येत्या सोमवारी 30 ऑगस्ट रोजी लावावी लागेल. दुसरी हजेरी 13 सप्टेंबर सोमवारी लावावी लागेल.

3. आवाजाचे नमुने द्यावे लागणार.

4. साक्षीदारांना धमकावू नये, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, तसेच पुन्हा अशी वक्‍तव्ये न करण्याची हमी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news