राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, माझ्यावर तुम्ही दबाव आणू शकत नाही!
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकमेकांना धाडलेल्या खरमरीत पत्राची चर्चा रंगली आहे. राज्यपालांनी अध्यक्ष निवडीला परवानगी राखून ठेवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्वाणीच्या शब्दांत राज्यपालांना सुनावले. त्यावर राज्यपालांनी, तुम्ही माझ्यावर असा दबाव आणू शकत नाही, असे प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेवरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे.
पत्र वाचून मी व्यथित झालोय, निराश झालोय. तसेच पत्रात जी मुदत देण्यात आली होती, त्यावरही राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझ्यावर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव आणणे योग्य नाही. तुमच्याकडे असे अधिकार नाहीत. मी घटनेच्या चौकटीत राहून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य असला पाहिजे.
सर्व बाबींचा विचार करून मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही, असेही राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रावरून भाजपनेही आक्षेप घेत सरकार राज्यपालांचा अवमान करीत असल्याचा आरोप केला आहे.

