

येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी घेतला होता. मात्र, मुलांचे लसीकरण न झाल्याने सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास टास्क फोर्सने विरोध केल्यामुळे शाळा बंदच राहण्याची चिन्हे आहेत.
मुलांचे लसीकरण झाले नसल्याने कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटपासून त्यांचे संरक्षण होण्याची शक्यता कमी असल्याने तूर्त शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशिरा टास्क फोर्ससोबत शालेय विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक बोलावली. मात्र, शाळांचा निर्णय गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
दुसरीकडे, वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्यातील सर्व विद्यापीठांना अहवाल पाठविण्यास आरोग्य विभागाने सांगितले आहे. पुढील आठवड्यात विद्यापीठांकडून अहवाल आल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गळी उतरवला खरा मात्र या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करताना सरकारने शाळासुरू करण्याचे निर्णय महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तथा स्थानिक प्रशासनाच्या हाती सोपवला होता.
कोरोना स्थिती मध्यम किंवा गंभीर असलेल्या ठिकाणी शाळासुरू करण्यास स्थानिक प्रशासनांकडूनच नकारघंटा वाजवण्यात आली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका आयुक्तांनीही शाळासुरू करण्यास स्पष्ट नकार दिला.
नकाराचा सूर पाहता 25 जिल्ह्यांत ग्रामीण व शहरी भागांत सर्व शाळासुरू होण्याची शक्यताच दिसत नव्हती. त्यातच आता टास्क फोर्सने सरळ सरळ शाळांची घंटा वाजवण्याविरुद्ध आपली नकारघंटा वाजवली.