

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारे नाले अद्यापही गाळाने भरलेले असल्याचे महापालिका अधिकारी व कृती समितीच्या संयुक्त पाहणीतून बुधवारी स्पष्ट झाले. यात पार्वती टॉकीजशेजारील नाला, कुंभार गल्लीतून वाहणारा नाला, राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळून वाहणारा नाला, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूने वाहणारा आदी नाल्यांचा समावेश आहे. नाल्यातील गाळामुळे शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही नाले सिमेंट-काँक्रिटच्या स्लॅबने झाकले असल्याने त्यातील गाळ काढणे अशक्य आहे. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यातही शहरात पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एम. जे. मार्केटच्या समोरील रस्ता क्रॉस करून स्टर्लिंग टॉवरपर्यंत तसेच पार्वती टॉकीजच्या दरवाजातून उत्तर दिशेला आलेला नाला वजा मोठे गटार वळसा घालून एम. जे. मार्केटच्या नाल्यात मिसळते. यातला संपूर्ण भाग सिमेंट-क्राँक्रिटने झाकला आहे.
शहरातून वाहणार्या यासह इतर नाल्यांतील गाळ अद्यापही काढलेला नसल्याचे पाहणीवेळी उघडकीस आले. दरम्यान, सफाई कर्मचार्यांना दैंनदिन स्वच्छतेसाठी लागणार्या 1700 घमेली, 1700 खोरी व लोखंडी पहार मिळण्याचा प्रस्ताव अद्यापही प्रशासन स्तरावर धूळखात पडल्याचा आरोप शहर कृती समितीने केला आहे. यावेळी बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, श्रीकांत पाटील, अविनाश दिंडे आदी उपस्थित होते.