

लंडन : लोण्याचा वापर आहारात अनेक प्रकारे केला जात असतो. पावावर लावून खाण्यापासून ते अनेक खाद्यपदार्थांवर सोडण्यापर्यंत लोणी वापरले जाते. या लोण्याची किंमत आपल्या आटोक्याबाहेर नसते. मात्र, हे झाले गायी-म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या साध्या लोण्याचे उदाहरण. जगात मांसाहारी लोण्याचाही वापर केला जात असतो. इंग्लंडमधील एक कंपनी झिंगे व खेकड्यांचा वापर करूनही लोणी बनवते. या लोण्याची किंमत आहे 9,817 रुपये प्रति 200 ग्रॅम.
या लोण्याला 355 परीक्षकांनी जगातील सर्वात चांगल्या खाद्यपदार्थांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे. हे लोणी 'सबलाईम बटर' नावाची कंपनी बनवते. त्याचे नाव आहे 'रिडिक्युलस नं.55 लॉब्स्टर अँड क्रॅब बटर'. स्वादाच्या बाबतीत ते एखाद्या 'क्लासिक बटर'सारखेच असते.
मात्र, यामध्ये लोण्याशिवाय अन्यही काही घटक असतात. यामध्ये क्वालिटी मिल्क फॅटबरोबरच झिंगे आणि खेकड्यांचे तुकडेही मिसळले जातात. तसेच सौंफ, लिंबू आणि कॅव्हीएरही यामध्ये समाविष्ट असते.
कोणत्याही ब्रेड, बिस्किट किंवा बाह्य साधनाशिवाय हे लोणी तसेच चमच्यात घेऊन मिटक्या मारत खाल्ले जाऊ शकते असा अभिप्राय परीक्षकांनी दिला आहे. 'सबलाईम बटर'चे संस्थापक ख्रिस मेअर यांनी सांगितले की गेल्यावर्षी त्यांनी ट्रफल, बोन मॅरो आणि ब्लू स्टिशेल्टन बटरही बनवले आहे. हे लोणी वेगवेगळ्या स्वादांमध्ये बनवले जाते.