

म्हसवड; पोपट बनसोडे : म्हसवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्व पक्षातील प्रमुख नेते उमेदवारांची चाचपणी करत आहेत. मात्र गत पाच वर्षांत शहराच्या ठप्प झालेल्या विकासाला सत्ताधार्यांसह विरोधकही जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, रासप गट एकत्र येऊन भाजपशी लढत देणार की पक्षीय पातळीवर सवते सुभे उभे करणार? पराभवाचे वचपे निघणार की अंतर्गत समेट होणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
म्हसवड पालिकेवर सुरुवातीच्या काळापासून स्व. श्रीमंत गुलाबराव राजेमाने यांची एक हाती सत्ता होती. त्यांच्यानंतर त्यांच्याच राजघराण्यातील श्रीमंत अजितराव राजमाने यांना अनेक वर्षे पालिकेवर सत्ता कायम ठेवण्यात यश आले होते. त्यांच्या साम्राज्याला माजी नगराध्यक्ष विलासराव माने आणि सुरुंग लावला होता. त्यांनी 10 वर्षे पालिकेच्या सत्तेत राहून शहराचा विकास साधला.
भाजप-शिवसेना युतीच्या काळात 18 कोटीची नळ पाणीपुरवठा योजना राबवून शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवला होता. मात्र माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या साम्राज्याला आ. जयकुमार गोरे यांनी सुरुंग लावून म्हसवड नगरपालिकेत शिरकाव केला. त्यांनी शहरवासियांना दिलेला अजेंडा प्रभावीपणे राबवत विविध विकास कामे मार्गी लावली. मात्र गत पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीमध्ये आ. गोरे यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावत शेखर गोरे यांच्या परिवर्तन पॅनलने सतरा पैकी दहा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.
नगराध्यक्ष पदाच्या थेट लढतीमध्ये तुषार विरकर यांनी विजयभाऊ शिंदे यांचा 67 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे म्हसवड नगरपालिकेत सत्तेच्या चाव्या शेखर गोरे, अजितराव राजमाने, विलासराव माने यांच्याकडे आल्या होत्या. मात्र परिवर्तन पॅनलमध्ये उपनगराध्यक्ष व इतर निवडीवरुन फुट पडली. त्यानंतर परिवर्तन पॅनल 5 वर्षे उभारी घेऊ शकले नाही. या परिवर्तन पॅनलमधील निवडून आलेल्या नगरसेवकांनी सवते सुभे निर्माण केले. तसेच राजकीय कुरघोड्या व लाथाळ्या या खेळामुळे म्हसवड शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न भंग झाले.
सत्ताधार्यांच्या अपयशामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची तहान अर्ध्यावरच भागवावी लागत होती. याचबरोबर विविध विकासकामे नियोजनाअभावी माघारी गेली. म्हसवड शहरातील मतदारांनी ज्या विश्वासाने पालिकेच्या चाव्या सत्ताधार्यांच्या हातात दिल्या त्याचा विश्वासघात झाल्याची भावना म्हसवडकरांना सतावत आहे. तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले असतानाच त्यांना जाब विचारुन ही कामे मार्गी लावण्यात विरोधकही अपयशी ठरले आहेत.
याचबरोबर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपला फंड पाच वर्षांमध्ये म्हसवड शहरात खर्ची टाकला नसल्याची खंत म्हसवडकर व्यक्त करत आहेत. म्हसवड परिसरात सुरु असलेली एमआयडीसी इतरत्र हलवण्याचे नुकतेच सुतोवाच केल्याने म्हसवड परिसरामध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याचा परिणाम आगामी म्हसवड नगरपालिका निवडणुकीवर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्याचबरोबर म्हसवड हे गाव उरमोडी लाभक्षेत्रात नसल्याने लोकांना पैसे मिळाले नाहीत. तसेच कुळ हक्काच्या जमिनीचाही प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे गटाला गत पंचवार्षिक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता राज्यामध्ये त्यांच्या विचाराचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन सक्षम पर्याय देणार का? राष्ट्रीय समाज पक्ष हा या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार? वंचित बहुजन आघाडी व प्रहार संघटना या निवडणुकीत उतरणार का याबाबत शहरात चर्चेला उधान आले आहे.
तसेच नगराध्यक्षपदाचे आरक्षण कधी पडणार व नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार की नगरसेवकांमधून याबाबतही
राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.