

नवी दिल्ली : जे लोक सडपातळ असतात, त्यांची शारीरिक हालचाल फार असते, ते भरपूर चालतात, त्यामुळे त्यांनी कितीही खाल्ले तरी त्यांचे वजन वाढत नाही, असा यापूर्वी समज होता. मात्र, नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार हा समज चुकीचा ठरला आहे. नव्या संशोधनानुसार अन्य लोकांच्या तुलनेत सडपातळ लोक अधिक व्यायाम करत नाहीत तर ते कमी खातात, यामुळेच त्यांचे वजन कमी अथवा नियंत्रणात असते.
एबरडिन युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आलेल्या या संशोधनात अत्यंत सडपातळ असलेल्या 150 लोकांना सहभागी करून घेण्यात आले. या लोकांची एनर्जी लेव्हल पाहून त्यांची 173 सामान्य लोकांशी तुलना केली गेली. दोन आठवडे चाललेल्या या संशोधनात असे आढळले की, सहभागी सडपातळ लोकांनी 23 टक्के कमी व्यायाम केला. तसेच त्यांनी बसून राहण्यातच बहुतेक वेळ घालविला. याशिवाय सडपातळ असलेल्यांनी इतरांच्या तुलनेत 12 टक्के कमी खाद्य खाल्ले. मात्र, त्यांचे रेस्टिंग मेटाबॉलिज्मचा वेग जास्त होता. यामुळे सामान्य लोकांच्या तुलनेत सडपातळ लोकांची अधिक कॅलरिज बर्न होण्यास मदत मिळत होती.
एबरडिन युनिव्हर्सिटीचे आणि या संशोधनाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर जॉन स्पिकमॅन यांनी सांगितले की, खरोखरच या संशोधनाचे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आहेत. कारण, सडपातळ लोक हे इतरांच्या तुलनेत कमी खातात म्हणूनच त्यांचे वजन वाढत नाही.