

73 व्या प्रजासत्ताकदिनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एक घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयातून मांडलेल्या संकल्पनेनुसार लवकरच विद्यापीठात ते गणित म्युझियम आणि सायन्स पार्क यांची निर्मिती करणार आहेत. आख्खं विद्यापीठ हेच पार्क मानून त्यात बागडायची सवय अनेक विद्यार्थ्यांना एरव्हीही असते. म्हणून प्रस्तावित सायन्स पार्कचं आम्हाला एवढं काही वाटलं नाही; पण चौथी ते बारावीपर्यंतच्या मुलांना खेळाच्या माध्यमातून गणित शिकवण्यासाठी गणित म्युझियम निघावं या कल्पनेची टोटल आम्हाला लागेना.
भारत फोर्ज कंपनी त्याला आर्थिक साह्य करणार आहे म्हणे! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम विद्यापीठाने राबवणं योग्यच आहे, तरीपण गणित म्युझियममध्ये काय काय दाखवतील बरं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
'एकोणतीस नव्वेवर' न अडखळता अस्खलितपणे तो पाढा म्हणणारा विद्यार्थी दाखवतील? इंग्रजीतल्या बिलियन, ट्रिलियन वगैरेंचे अचूक मराठी प्रतिशब्द येणारी माणसं, चक्रवाढ व्याजाची गणितं फटाफट सोडवणारे भिडू चौकटीत दाखवतील? की निरक्षर भाजीवालीने 'तेरा रुपये पाव' या दराची दीडपाव भेंडी केवढ्याला पडेल हे तोंडी हिशेबाने सांगितल्यामुळे तिलाच म्युझियममध्ये ठेवतील? आताशा मुलांना छोट्या छोट्या हिशेबांसाठीही कॅलक्युलेटर, मोबाईल अॅप्स वगैरे लागतात. (परवाच दारावर विक्रीसाठी 50 रुपये डझन या भावाने येणार्या केळ्यांचा एका ग्राहक मुलाने केलेला हिशेब पाहिला.
त्याने मोबाईलवर बरीच झटापट करून शेवटी तीन केळ्यांसाठी उणे साडेतेरा रुपये मोजावे लागतील असं 'काढलं' होतं!) त्यांच्यासाठी सवायकी, अडीचकी वगैरेंचे तक्तेटांगतील का त्या म्युझियममध्ये? गणित विषयावर खरंखुरं प्रेम असणारे विद्यार्थी तर शोधावेच लागतील त्यात ठेवायला, असे अगणित विचार आमच्या मनात आले. आम्ही आपले आयुष्यभर गणिताला घाबरत आलो. त्यात पोटापुरते मार्क मिळतील याची काळजी घेत राहिलो.
आमच्या मनाने गणित आम्ही केव्हाच म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. तो एक असा विषय आहे की, ज्यात मूठभर बुद्धिमान माणसं आयुष्यभर रमतात, नवे नवे फॉर्म्युले वगैरे काढतात आणि अगणित सामान्य माणसं त्यातलं एक अक्षरही न कळता आपापल्या अत्यल्प आवकीत आपलं सगळं जगणं कोंबण्याचा आपापला फॉर्म्युला शोधतात. भास्कराचार्यांनी लीलावतीला शिकवलेलं गणित म्युझियममध्ये येवो आणि आपल्या घरगुती गणितीलीला चक्रवाढ दराने वाढत राहोत, हीच त्या जगन्नियत्याच्या चरणी प्रार्थना!
– झटका