

वॉशिंग्टन : मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता बळावली आहे. मानवी सभ्यता अस्तित्वात येण्यापूर्वीही अनेक लघुग्रह पृथ्वीवर धडकले आहेत. यापैकी एक असलेल्या 'चिक्सुलब' नामक लघुग्रहाने सुमारे 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी धडक दिल्याने पृथ्वीवरील तत्कालीन महाकाय प्राणी म्हणजे डायनासोर नष्ट झाले होते.
हा लघुग्रह सुमारे 150 कि.मी. मोठा होता. यामुळे मेक्सिकोतील खाडीनजीक चिक्सुलब नामक क्रेटरची निर्मिती झाली. तसेच असे अनेक लघुग्रह पृथ्वीवर धडकले आहेत. त्यामुळे वातावरणाची निर्मिती झाली.
आजपर्यंत पृथ्वीवर किती लघुग्रह आदळले आहेत, हे सांगणे अशक्य आहे. मात्र यासंबंधीच्या संशोधनातून असे स्पष्ट होते की, भविष्यात एखादा मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता पूर्वीच्या अंदाजापेक्षा 10 पटींनी जास्त आहे.
साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या मते, चिक्सुलबसारखा एखादा मोठा लघुग्रह भविष्यात पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 10 पटींनी वाढली आहे.
संशोधकांच्या मते, जर पृथ्वीवर एखादा मोठा लघुग्रह आदळला तर प्रचंड नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. असे जर झाले तर मानवी अस्तित्वावर मोठे संकट निर्माण होणार आहे.
असे असले तरी येणार्या 100 वर्षांत तरी अशी घटना घडण्याची जराही शक्यता नाही. दरम्यान, असे संकट भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने आतापासूनच लघुग्रहांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
येत्या शंभर वर्षांत असे 22 लघुग्रह आहेत की, ते पृथ्वीवर धडकण्याची किंचित शक्यता आहे.