

पॅरिस ; वृत्तसंस्था : लियोनेल मेस्सीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली असून, बार्सिलोना क्लबपासून मुक्त झालेला मेस्सी आणि बार्सिलोनामधील त्याचा जुना सहकारी ब्राझीलियन फुटबॉलस्टार नेमार यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा मैदानात एकत्र दिसणार आहे.
मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा केल्यानंतर आता तो पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडून खेळणार आहे. लवकरच पॅरिसमध्ये पीएसजीसोबत तो करार करणार आहे. पीएसजीकडून त्याला वर्षाला 257 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे.
हा करार दोन वर्षांचा असून 2024 पर्यंत मुदत वाढवण्याची शक्यता आहे. बार्सिलोना सोडल्यानंतर मेस्सीकडे दोन पर्याय होते. मात्र, त्याने पीएसजीसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्सीच्या वडिलांनी पीएसजीसोबत खेळणार असल्याचे सांगितले आहे.
अर्जेंटिना आणि बार्सिलोनासाठी विक्रमी गोल करणार्या 34 वर्षीय मेस्सी ने आतापर्यंत सहावेळा 'बॅलेन-डी-ओर पुरस्कार' जिंकला आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मेस्सीने जड अंत:करणाने बार्सिलोनाचा निरोप घेतला होता.
क्लबने म्हटले आहे की, ते आता मेस्सीला क्लबमध्ये ठेवण्याची जोखीम घेऊ शकत नाहीत. मेस्सीसोबतचा करार पुढे वाढवता न येण्यासाठी क्लबने ला लीगाच्या नियमांना दोषी ठरवले होते.
पीएसजीची आघाडीची फळी ही आताची सर्वात ताकदवान समजली जाते. या संघात ब्राझीलचा नेमार, अर्जेंटिनाचा एंजल डी मारिया आणि फ्रान्सचा एम्बाप्पे यांचा समावेश आहे.
यात मेस्सीचा समावेश झाल्यास पीएसजीची ताकद कितीतरी पटीने वाढणार आहे. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्पेनचा सर्जिओ रामोस आणि युरो चषक विजेत्या इटलीचा गोलरक्षक डोनारुमा यांनाही करारबद्ध केले आहे. सेंट-जर्मेन संघ फ्रान्समधील लीग-1 चषक फुटबॉल स्पर्धेत खेळतो.
पीएसजीला अजून चॅम्पियन्स लीग जिंकता आलेली नाही. त्याद़ृष्टीने त्यांची संघबांधणी सुरू आहे. मेस्सीच्या समावेशानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आणखी धुमारे फुटणार आहेत.