

भुईंज ; पुढारी वृत्तसेवा : सासरच्या छळास कंटाळून अवघ्या 3 वर्षांच्या स्वतःच्या मुलाला विषारी औषध देऊन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वरचे चाहूर येथे घडली. याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंद या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरचे चाहूर भुईंज येथील पूजा सुदाम भोरे हिने सासरच्या छळास कंटाळून स्वतः विषारी औषध प्राशन करून मुलगा राजवीर यालाही विषारी औषध पाजले.
दरम्यान, या दोघांनाही सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पूजा हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. मुलगा राजवीर भोरे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान रात्री उशीरा भुईंज येथील स्मशानभूमीत पुजा हिच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. घटनास्थळी वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे -खराडे, भुईंजचे सपोनि आशिष कांबळे यांनी भेट देवून तपासाच्या सुचना दिल्या. या घटनेची रात्री उशीरा भुईंंज पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून अधिक तपास पी. एस. आय रत्नदीप भंडारे करत आहेत.
विवाहितेच्या भावाने आत्महत्येप्रकरणी नवरा सुदाम भगवान भोरे, सासरा भगवान बाबुराव भोरे, सासू हिराबाई भगवान भोरे व नणंद माधुरी किसन देडे (रा. काकरंबा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) यांच्या विरोधात तक्रार दिली असून संशयितांना ताब्यात घेण्यासाठी भुईंज पोलीस रवाना झाले आहेत.