

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संक्रमण घटत असले तरी परिस्थिती पाहूनच लोकल आणि हॉटेल सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बेस्टच्या इलेक्ट्रिक बस आणि माहीम बस डेपोचे लोकार्पण करताना स्पष्ट केले. कोरोनाकाळातदेखील बेस्टच्या कर्मचार्यांनी अविरत सेवा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
बेस्ट, लोकल, मोनो, मेट्रो प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट असावे,याबाबत नियोजन सुरू आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. रिमोट कंट्रोलद्वारे वातानुकूलित बसमार्ग क्रमांक 115 आणि 116 चे उद्घाटन आणि लोकार्पणही त्यांनी यावेळी केले.
पर्यावरण जपण्यासाठी बेस्टने ओलेक्ट्रा कंपनीकडून काही इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. आता टाटा कंपनीकडून बस भाडेतत्वावर घेण्यात येत आहे. टाटाकडून 175 मिनी व 175 मोठ्या इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 मोठ्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले.
यामुळे बेस्टच्या ताफ्यातली एकूण इलेक्ट्रिक बसची संख्या 265 झाली आहे. या बसला चार्जिंग करण्यासाठी शिवाजी नगर, मालवणी आणि बॅकबे डेपो येथे चार्जिंगची व्यवस्था केली आहे. सप्टेंबर महिन्यात आणखी 115 इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत.
लोकार्पणप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर,उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, आमदार सदा सरवणकर, नगरसेवक मिलिंद वैद्य, माजी महापौर श्रद्धा जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, सुनील अहिर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. पी. वेलरासू , महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
* बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. माँ आणि बाळासाहेब आम्हाला ट्राममधून फिरायला न्यायचे. मी शाळेत बेस्ट बसमधून जात होतो.
* बेस्टचा कंडक्टर प्रवाशांना तिकीट देण्यासोबतच सतत आगे बढो, आगे बढो सांगत असतो. त्याप्रमाणे देशाला सतत आगे बढो,आगे बढो म्हणणारा पंतप्रधान पाहिजे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.
* बेस्टच्या 1005 सेवानिवृत्त कर्मचार्यांना उपदानाची 94.21 कोटी रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते रिमोट कंट्रोलद्वारे जमा करण्यात आली.