

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई लोकल मध्ये आणि बेस्ट बसबाहेर लटकत प्रवास करणार्या चाकरमान्यांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, मुंबईत रोज ये-जा करणार्या 70 लाख प्रवाशांवर दोन डोसशिवाय कोणतेच निर्बंध लागू नाहीत असे चित्र आहे.
मुंबईत बेस्ट बसेसमधून दररोज सरासरी 23 ते 24 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. याउलट मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेच्या 1 हजार 774 फेर्यांमधून सरासरी 30 लाख आणि पश्चिम रेल्वेच्या 1 हजार 375 फेर्यांमधून सरासरी 23 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. परिणामी, मुंबईत दररोज प्रवास करणार्या 70 लाखांहून अधिक प्रवाशांचे नियोजन शासन कसे करणार, असा प्रश्न असून, ही गर्दी कोरोनाची लाट नव्हे, तर त्सुनामी घेऊन येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तूर्त प्रशासनाने लोकल आणि बेस्ट बसेसमधून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक केले आहे. या निर्बंधानंतर तातडीने बहुतांश चाकरमान्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेत युनिव्हर्सल पास काढून घेतले. मात्र सरसकट पास काढलेल्या चाकरमान्यांचा आकडा वाढल्याने लोकल आणि बेस्ट बसेसमध्ये पुन्हा गर्दी उसळू लागली आहे.
मुंबईत 31 डिसेंबरला 5 हजार 631 नवे रुग्ण आढळले. याच दिवशी मध्य रेल्वेने 23 लाख, तर पश्चिम रेल्वेने 19 लाख प्रवाशांनी प्रवास केला. बेस्ट बसने 23 लाख प्रवाशांनी थर्टीफर्स्टला प्रवास केल्याची माहिती आहे.
या प्रवाशांनी कोरोनाचे नियम काटेकोर पाळले नाहीत तर रोज उसळणार्या या गर्दीतून संक्रमण आणखी वेगाने पसरेल, अशी भीती आहे. रेल्वे प्रवाशांवर लक्ष ठेवणे हे आणखी एक मोठे आव्हान आता होऊन बसले आहे.