

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : खार पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाल्याचा आरोप करणारे पत्र अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवले आणि या आरोपाचे खंडन करणारा व्हिडीओ ट्विट करून पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी या आरोपातली हवाच काढून घेतली.
या व्हिडीओमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही खार पोलीस ठाण्यात निवांत बसलेले दिसतात. पोलीस अधिकार्यांसोबत चहा-कॉफी घेताना दिसतात. समोर टेबलवर पाण्याच्या बाटल्याही ठेवलेल्या आहेत.
बारा सेकंदाचा हा व्हिडीओ चर्चेत येताच राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी खार पोलीस ठाण्यात नव्हे तर सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये वाईट वागणूक दिल्याचा आरोप असल्याचा खुलासा केला. आता सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये नवनीत राणांना ठेवले होते. लॉकअपमध्ये सीसीटीव्ही नसतो. त्यामुळे तेथील व्हिडीओ जारी होण्याची शक्यता नाही.
केंद्राचे महाराष्ट्राला पत्र
आपल्याला पाणी दिले नाही, बाथरूमचा वापर करू दिला नाही. अनुसूचित जातीची असल्याने वाईट वागणुक देण्यात आली, असे गंभीर आरोप करणारे पत्र नवनीत राणा यांनी पाठवताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गंभीर दखल घेतली. लोकसभेच्या विशेष हक्क समितीनेही या संदर्भातील अहवाल मागवला. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला नवनीत राणा यांनी अटकेनंतर केलेल्या आरोपांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल 24 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले.
पोलीस ठाण्यातील अन्य कैद्यांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेज लोकसभा अध्यक्षांना पुरावा म्हणून पाठवले जाईल. राणा यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिाकार्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी व्हायरल केलेला व्हिडीओ निर्णायक खुलासा ठरला.
तक्रारीत तथ्य नाही : वळसे-पाटील
खासदार नवनीत राणा यांनी आपण मागासवर्गीय असल्यामुळे खार पोलिसांनी वाईट वागणूक दिल्याच्या तक्रारीची चौकशी केली आहे. या तक्रारीत तथ्य नाही. तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी मागवलेली माहिती राज्य सरकारकडून पाठवली जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.