

मुंबई ; राजेश सावंत : शिवसेनेसोबत आघाडी केली तर काँग्रेसचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आणि आघाडी नाही केली तर, काँग्रेसचे अस्तित्वच संपण्याचा धोका, अशा दोन मतप्रवाहांमुळे मुंबई काँग्रेसची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली आहे. त्यामुळे काँग्रेस साठी मुंबई महापालिकेची निवडणूक कसोटीची ठरणार आहे.
मुंबईमध्ये पूर्वी काँग्रेसचा दबदबा होता. काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा आणि त्यानंतर गुरुदास कामत यांनी काँग्रेसला वेगळ्या उंचीवर नेले होते. कामत यांच्या काळात तर मुंबई शहरातील सहाही लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस व राष्ट्रवादीचे खासदार होते. विधानसभेतही मुंबईतील काँग्रेस आमदारांची संख्या सर्वाधिक होती. मुंबई महानगरपालिकेतही भक्कम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जात होते.
परंतु गेल्या दहा वर्षात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या अवघे 31 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही मिळणे काँग्रेससाठी अवघड होते. मात्र शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळाले. राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर काँग्रेसला काही अंशी चांगले दिवस आले.
त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करावी असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. पण हे कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य नाही. शिवसेनेसोबत आघाडी केल्यास काँग्रेसचे आहे तेही अस्तित्व संपून जाईल, अशी भिती मुंबईतील कार्यकर्त्यांना वाटत आहे. काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर आघाडी केल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो असं कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
भाजपाला शह देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. पण आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास प्रत्येक पक्षाचे अस्तित्व जैसे थे राहील, असे कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. आघाडीत सामील झाल्यास काँग्रेसची पारंपरिक मतेही विभागली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवून सत्तेत एकत्र यायचे असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे.
मात्र स्वतंत्र निवडणूक लढवली तर, मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आघाडीत सामील होणे हेच काँग्रेसच्या हिताचे असल्याचा सूर काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे. मुंबईतील काँग्रेसचे विद्यमान नगरसेवकांनीही आघाडीत सामील व्हावे, असे मत मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे व्यक्त केले. आघाडीत काँग्रेसने सामील व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही प्रयत्नशील आहेत. मात्र काँग्रेसमधील मतभेदांमुळे आजही आघाडीबाबतचा घोळ कायम आहे.