

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या दोन एक्स्प्रेसच्या अपघाताचा फटका शनिवारी दिवसभर मध्य रेल्वेच्या लोकल-मेल-एक्स्प्रेसला बसत राहिला. अपघातग्रस्त डबे रुळांवरुन हटवून वाहतूक सुरू करेपयर्ंत शनिवारची दुपार उजाडली. तोपर्यंत जलद आणि धीम्या लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. अपघातामुळे बंद पडलेला डाऊन जलद मार्ग सुरु होण्यासाठी तब्बल 16 तास लागले.
शनिवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी अप जलद मार्गावरून लातूर एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकापर्यंत नेली. तर दुपारी सव्वा वाजता डाऊन जलद मार्गावरुन सीएसएमटी-चेन्नई ही पहिली ट्रेन चालविली. शनिवारी भारतीय रेल्वेने 170 व्या वर्षात पदार्पण केले. मात्र रेल्वेचा हा वाढदिवस साजरा न करता मुंबईकरांना लोकलचा खोळंबा, मनस्ताप आणि गर्दीला सामोरे जावे लागले.
शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास जलद मार्गावर दादरहून सुटलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला सीएसएमटी-गदग एक्स्प्रेसने दादर मांटुगा स्थानकादरम्यानच्या क्रॉसिंगवर धडक दिली आणि पुदुच्चेरीचे तीन डबे घसरले आणि मेल-एक्स्प्रेस आणि लोकल वाहतुकीचे तीन तेरा वाजले.
शनिवारी सकाळपासूनच धीम्या मार्गावरील लोकल सुरू होत्या. परंतु डाऊन जलद मार्ग मात्र भायखळा ते माटुंगा दरम्यान वळविण्यात आला. माटुंगानंतर धीम्या मार्गावरील लोकल कुर्ला किंवा घाटकोपरवरुन पुन्हा जलद मार्गावर चालविण्यात आल्या. त्यामुळे धीम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. लोकल 30 ते 40 मिनिटे विलंबाने धावत असल्याने शनिवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला.
कल्याण ते भायखळापर्यंत सर्वच स्थानकांत तुफान गर्दी होती. यामध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवा, ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर या स्थानकांत तर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. दुपारी सव्वा वाजता वाहतूक सुरु झाली तरी रात्री उशिरापर्यंत लोकल विस्कळीतच होती.