

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करत त्यांच्या खेळाचा दर्जा उंचावणारे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निवृत्त प्राध्यापिका ललिता, दोन मुली आणि माजी भारतीय क्रिकेटर व निवडसमिती सदस्य असलेला मुलगा जतीन परांजपे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेटचा द्रोणाचार्य हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेल्या सहा दशकांपासून भारतीय क्रिकेट विशेषकरून मुंबई क्रिकेटमध्ये परांजपे यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. यात त्यांनी प्रशिक्षक, सिलेक्टर, मार्गदर्शक आणि ज्या कोणाला क्रिकेटसंदर्भात कोणतीही मदत लागली तर ते सदैव तयार असायचे. वासू परांजपे यांनीच भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना 'सनी' हे टोपणनाव दिले.
वासू परांजपे यांनी आपल्या 29 प्रथम श्रेणी सामन्यात 785 धावा केल्या. खेळाडूंच्या मानसिकतेवर मोठे काम त्यांनी केले. हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती या भाषा त्यांना येत होत्या. त्यांनी दादर युनियन क्लबचे कर्णधारपद भूषविले. या क्लबकडून सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकरसारखे आघाडीचे खेळाडू तयार झाले. 1987 विश्वचषक स्पर्धेपूर्वी मुंबईमध्ये भारतीय संघाच्या तयारीसाठी आयोजित शिबिराच्या देखरेखेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. एमआरएफ पेस फाऊंडेशनसाठी त्यांनी दिग्गज माजी गोलंदाज डेनिस लिली यांना देखील सहाय्य केले.
त्यांचा मुलगा जतिनने आनंद बासू यांच्यासह पुस्तक क्रिकेट द्रोण लिहिले. ज्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आपल्या कारकिर्दीत वासू सरांच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे.1987 साली बीसीसीआयने पहिल्यांदा 15 वर्षांखालील राष्ट्रीय शिबिराचे इंदूर येथे आयोजन केले होते. त्यावेळी त्या युवा खेळाडूंना वासू सरांकडून मार्गदर्शन मिळाले. त्या संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विनोद कांबळी या खेळाडूंचा समावेश होता. सचिन या शिबिरात फलंदाजी करत होता आणि तो नेट्सच्या बाहेर देखील येत नव्हता आणि वासू सरांनी त्याला इतरही फलंदाजांना संधी द्यायची असल्याचे सांगितले,अशी आठवण गांगुली यांनी सांगितली.
वासू परांजपे यांच्या निधनानंतर त्यांच्या माटुंगा येथील निवासस्थानी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव संजय नाईक यांसह अनेक जण सांत्वन करण्यासाठी गेले होते.
सुनील गावस्कर यांनी त्यांच्या सनी डेज या आत्मचरित्रात परांजपे यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट तत्वज्ञानाची आवड कशी होती याबद्दल लिहिले होते आणि एकदा दादर युनियन संघ 70 च्या दशकाच्या सुरुवातीला मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी गेला होता. त्यांना एकदा एका तलावात फेकण्यात आले होते. वासू यांना पोहोयचे कळत नव्हते पण, तरीही त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य होते. अशी आठवण गावस्कर यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली.